चंद्रपूर :
झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे या उद्देशाने बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (बीआरटीसी)तर्फे लोहारा येथे आयोजित 15 दिवसीय बांबू विणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रशिक्षण आपल्या दारी या बीआरटीसी च्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील 20 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.बाजारपेठेत असलेली बांबू मॅट ची वाढती मागणी लक्षात घेता महिलांना विविध प्रकारचे बांबू मॅट तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा लाभ आवश्यक साधनसामुग्री सह यातून देण्यात आला.
या प्रसंगी महिलांनी प्रशिक्षणातून तयार केलेल्या विविध बांबू मॅट ची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती ज्यामधे जिल्ह्यातील विविध बांबू वस्तू उत्पादक व खरेदीदार यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून महिलांनी तयार केलेल्या विविध बांबू मॅटचे कौतुक केले.
अशा प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास होईल असा विश्वास केंद्राचे संचालक श्री. अविनाश कुमार यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. यावेळी सरपंच किरण चालखुरे, बीआरटीसी चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, प्रशिक्षक किशोर गायकवाड,संतोष बजाईत, बांबूटेक ग्रीन सर्विसेसचे अन्नपूर्णा धूर्वे, अनिल दहागावकर, बांस कंपनी लोहारा चे ऐश्वर्य बांगडे आणि गावकरी उपस्थित होते.