Google search engine
Home Environment issues जागतिक आद्रभूमी दिनानिमित्त मोहर्ली येथील मामा तलावाच्या किनारपट्टीची स्वच्छता

जागतिक आद्रभूमी दिनानिमित्त मोहर्ली येथील मामा तलावाच्या किनारपट्टीची स्वच्छता

0
264

– कचऱ्यामुळे वाढता धोका, सौंदर्यीकरण रखडल्याने नागरिकांची चिंता

मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग) :

दि. २ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आद्रभूमी दिन (World Wetlands Day) निमित्त मोहर्ली येथील मामा तलावाच्या किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात वनविभाग मोहर्ली (कोर), पर्यटक मार्गदर्शक (गाईड) तसेच जिप्सी चालक–मालक यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्वच्छता करताना तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर घनकचरा साचलेला आढळून आला. यामुळे तलावाच्या नैसर्गिक सौंदर्यावर परिणाम होत असून, पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात गट ग्रामपंचायत मोहर्ली गावाच्या सरपंच सौ. सुनिता कातकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, “मामा तलावाचा कारभार जिल्हा परिषदेकडे असून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.”

मात्र स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

स्थानिक पक्षीमित्र व निसर्गप्रेमी यांनी सांगितले की, जर तलावाचे सौंदर्यीकरण झाले तर परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील, पक्षी निरीक्षणासाठी योग्य पायवाट उपलब्ध होईल आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

दरम्यान, ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड यांनी सांगितले की, मामा तलाव हा जंगल परिसरालगत असल्याने कचऱ्यामुळे वाघ, बिबट्या यांसारखे वन्यप्राणी येथे लपून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मानव–वन्यजीव संघर्षाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तलावाची नियमित स्वच्छता करणे ही केवळ सौंदर्याच्या दृष्टीने नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड यांनी स्वच्छता मोहिमेसाठी व पुढील नियोजनासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कोर श्री.अरुण गोंड यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्याक (कोर) श्री. एस. आर. धागरगुंडे, श्री. व्ही. षी सोयाम वनरक्षक एस. कि. मरस्कोल्हे, के.व्ही. सुर्यवंशी, कु. एस. ए. महाजन, बी. वानखेडे, आर. षी मस्करे, एस. डी. बटिकर, ए.के. जाश्रय, एस. एस गोरे, डी. एस. वैद्य व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक आद्रभूमी दिनानिमित्त राबविण्यात आलेली ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता, आद्रभूमी संवर्धनाबाबत जनजागृती करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली आहे. मोहर्ली मामा तलावाचे सौंदर्यीकरण व नियमित देखभाल झाल्यास हा परिसर पर्यावरण, पर्यटन आणि स्थानिक नागरिकांसाठी आदर्श ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here