देशाचा मानबिंदू ठरणाऱ्या वन अकादमी च्या कामात दिरंगाई नको : आ. सुधीर मुनगंटीवार

0
260

बांधकाम आणि वन विभागाच्या समन्वय बैठकीत घेतला आढावा

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या आणि संपूर्ण देशाचा मानबिंदू ठरू पाहणाऱ्या वन अकादमीचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईतील विधान भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

वन अकादमीचे काम तातडीने काम पूर्ण करून दोन महिन्यात त्याचे लोकार्पण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. अकादमीच्या कामासाठी बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांची एकत्र बैठक त्यांनी घेतली. इमारतरच्या बांधकामासाठी, अपूर्ण कामांसाठी निधीची अडचण आदी अनेक विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आगामी अर्थसंकल्पात अकादमीसाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी यावेळी दिले.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या दीड कोटी रुपयांच्या निधी संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. बांबू अकादमी, बॉटनिकल गार्डन, तारांगण इत्यादी विषयांवरदेखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. येणाऱ्या मार्चपर्यंत ईमारत बांधकामासाठी पावणे बारा कोटी रुपये मंजूर करता येतील, अशी महिती वन विभागाचे उप सचिव गजेंद्र नरवणे यांनी दिली. क्षुल्लक कारणांसाठी भव्य अकादमीचे काम थांबवू नका. गरज असेल तेथे आपण स्वतः संबंधित मंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत, परंतु प्रशासकीय कामात दिरंगाई नको, अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव, वन अकादमीचे महीप गुप्ता, एम. श्रीनिवास राव, प्रदीप कुमार, उपसचिव गजेंद्र नरवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here