
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड वनपरिक्षेत्रात 4 जानेवारी 2025 रोजी दोन वाघांमध्ये झुंज झाली होती. या झुंजीत दोन्ही वाघ गंभीर जखमी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर वन विभागाने दोन्ही वाघांवर पाळत ठेवली होती. यापैकी एक वाघ दूर निघून गेला, तर दुसरा वाघ झुंजीच्या ठिकाणाजवळच फिरत असल्याने वन विभाग त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होता.
10 जानेवारी 2025 रोजी या वाघाने पारडी (ठवरे) येथील शेतकरी गुरुदेव पुरुषोत्तम सारये (वय 42) यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. तपासानंतर हल्ला करणारा वाघ हा झुंजीतील जखमी वाघ असल्याचे स्पष्ट झाले. जखमी वाघाला शिकार करण्यात अडचण येत होती आणि तो आठवडाभर उपाशी होता. त्यामुळेच त्याने शेवटी माणसावर हल्ला केला.
वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांकडून परवानगी घेतली आणि या वाघाला पकडण्यासाठी जलद कार्यवाही केली. अखेर आज सकाळी या जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले.
पकडण्यात आलेल्या वाघाचा तपशील
- वाघ T-100 आयडी असलेला असून, अंदाजे 10-11 वर्षे वयाचा नर वाघ आहे.
- त्याला नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 110, कोसंबी (गवळी) बीट येथे पकडले गेले.
- वाघाला चंद्रपूर येथील TTC (Transit Treatment Centre) येथे हलविण्यात आले आहे.
वाघ पकडण्यासाठी केलेली कार्यवाही
ही रेस्क्यू ऑपरेशन वरिष्ठांच्या आदेशानुसार व खालील टीमच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली:
- रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR
- जलद बचाव पथक (RRT), TATR
- अजय सी. मराठे, पोलीस हवालदार नेमबाज
- RRT सदस्य: विकास ताजने, योगेश लकडे, प्रफुल वडघुरे, गुणानक ढोरे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख
- RRT चालक: अमोल कोरपे, अक्षय दांडेकर
- वन्यजीव जीवशास्त्रज्ञ: नूर अली सय्यद (मध्य चांदा)
उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी
- राकेश सेपट, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी वन विभाग
- राकेश अहुजा, बायोलॉजिस्ट, ब्रह्मपुरी वन विभाग
- अरुप कन्नमवार, नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी
- क्षेत्र सहाय्यक: सय्यद, नेरलवार, तावाडे
- वन रक्षक: कुथे, नवघडे, कुलमेथे
- नागभीड वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी व मजूर
जनतेने सुटकेचा निश्वास सोडला
या वाघाला पकडल्यामुळे परिसरातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. वन विभागाने जलद कार्यवाही करून परिसरातील लोकांचा जीव वाचवला. आता हा वाघ चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठवला आहे.
