चंद्रपूर :- ऊर्जानगर, दुर्गापुर, सिटीपीएस प्रकल्प तसेच लगतच्या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या हल्ल्यात परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे.
काही दिवसांपूर्वी एका ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्याच्या काही कालावधीनंतर एका कामगारावर वाघिनीने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर प्रकल्पातील एका कामगारावर वाघाने हल्ला करून ठार केले. याच घटनेच्या अनुषंगाने वन विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही उपाय योजना न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी अन्नबत्याग आंदोलन सुरू केले.
एका कामगाराला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना काल दि. 17 फरवरी 2022 रोजी देखील एका १६ वर्षाच्या मुलाला बिबट्याने जंगलात उचलून नेले असून काल रात्री पासून शोध घेतल्या नंतर आज सकाळी त्याचे शव मिळाले.
सर्व कामगार ज्या प्रकल्पात काम करतात त्या प्रकल्पाच्या जवळपास ६ मोठे वाघ असल्याची अधिकृत आकडेवारी काल वन विभागाने जाहीर केली.
यामुळे सर्व कर्मचारी, कामगारांमध्ये तसेच सभोवतालच्या नागरिकांमध्ये अस्वस्थतेच व भीतीचे वातावरण असून नितीन भटारकर यांच्या तर्फे सुरू केलेल्या उपोषणाला, आंदोलनांना आज दि. 18 फरवरी 2022 ला सर्व कामगारांसह सर्व सामान्य नागरिकांनी जाहीर पाठिंबा व समर्थन दिला.