
मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जुनोना गेट परिसरात आज सकाळी घडलेल्या एका घटनेने काही काळ स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वन विभागाच्या युवक निवास परिसरात सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघीणीचे दोन बछडे सकाळी सुमारे ५.३० वाजता आत शिरले, ज्यामुळे काही वेळ MTDC मार्गावरील वाहन वाहतूक थांबविण्यात आली.
सदर परिसरात सध्या बांधकाम सुरू असल्याने कंपाउंडच्या गेटचा काही भाग तुटलेला होता, आणि त्याच फटीतून हे दोन्ही बछडे आत आले. युवक निवासाच्या चारही बाजूंनी उंच जाळीचे कंपाउंड असल्याने आत गेल्यानंतर त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग सापडला नाही. त्यापैकी एक बछडा स्वतःहून आत शिरलेल्या मार्गाने बाहेर पडला, तर दुसरा कंपाउंडच्या बाजूने फिरत बाहेर पडण्याचा रस्ता शोधत होता.
परिसरातील कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात घेत शांततेने बचावकार्य सुरू केले. बछडा ज्या भागात वारंवार फिरत होता, त्या भागातील कंपाउंडच्या जाळीचा काही भाग काळजीपूर्वक कापण्यात आला, जेणेकरून त्याला बाहेर जाता येईल.
यानंतर वाहनांच्या मदतीने दोन्ही बाजूंनी शांततेने त्याला बाहेरच्या दिशेने वळविण्यात आले. अखेर वाघाचा बछडा त्या कापलेल्या जाळीच्या जवळ आला आणि एका उडीसह तो बाहेर पडत जंगलाच्या दिशेने निघून गेला.
या रेस्क्यू ऑपरेशनला सुमारे दोन तासांचा अवधी लागला. या मोहिमेत कोर क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक व्ही. सोयाम व त्यांचे सहकारीही उपस्थित होते.
वन विभागाच्या समन्वयित, तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे कोणतीही मानवहानी किंवा जखम झाली नाही, तसेच वाघाचा बछड्यालाही कोणतीही इजा झाली नाही. या यशस्वी प्रयत्नामुळे ताडोबातील आणखी एक आदर्श वन्यजीव पुनर्स्थापन मोहिमेचे उदाहरण निर्माण झाले आहे.


 
                