ताडोबा परिसरात वीज पुरवठा सुधारण्याची गरज — प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी स्थानिकांचा पुढाकार

0
237

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):

ताडोबा परिसरातील भामडेळी व सितारामपेठ या भागातील काही रिसॉर्ट्समध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्याने पर्याय म्हणून 120 kv क्षमतेचे डिझेल जनरेटर वापरले जात आहेत. सतत जनरेटरचा वापर झाल्यामुळे परिसरातील हवेतील प्रदूषण आणि आवाज प्रदूषणात वाढ झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

डिझेल जनरेटरमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड (CO₂), सल्फर डायऑक्साइड (SO₂) आणि नायट्रोजन ऑक्साइड (NOx) या हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते.
हे वायू जंगलातील हवेचा दर्जा कमी करून झाडांच्या पानांवर रासायनिक थर तयार करतात, ज्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण (Photosynthesis) प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी झाडांची वाढ मंदावते आणि वनस्पतींची उत्पादनक्षमता घटते.

तसेच 120 केव्ही क्षमतेचा जनरेटर सतत चालू राहिल्यास 70 ते 90 डेसिबलपर्यंत आवाज निर्माण होतो. हा आवाज वाघ, बिबट्या, हरणे, पक्षी आणि लहान सस्तन प्राणी यांच्या नैसर्गिक हालचाली आणि प्रजनन व्यवहारावर नकारात्मक परिणाम करतो. अनेक पक्षी प्रजाती आवाजामुळे निवासस्थान बदलतात, ज्यामुळे परिसरातील जैवविविधतेवर दुष्परिणाम होतो.
पर्यावरणप्रेमी व  रिसॉर्टधारकांचे मत आहे की, ताडोबा हे जैवविविधतेने समृद्ध क्षेत्र असून येथे प्रदूषणमुक्त वातावरण राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवीन वीज केबल लाईन आणि आधुनिक पावर स्टेशन फक्त ताडोबा करिता उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वनविभागाकडूनही ताडोबा परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. डिझेल वाहनांच्या ऐवजी पेट्रोल आणि ई-वाहनांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, जर वीज पुरवठा स्थिर राहिला, तर जनरेटरचा वापर कमी होऊन परिसरातील आवाज व वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिक आणि रिसॉर्टधारकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ताडोबासारख्या संवेदनशील वनक्षेत्रात टिकाऊ विकास, स्वच्छ ऊर्जा आणि नैसर्गिक संतुलन या तिन्ही घटकांचा समन्वय साधणे हीच खरी गरज असल्याचे स्थानिकांचा ठाम विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here