
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिनांक १२ मे २०२५ रोजी “निसर्गानुभव” हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी ताडोबाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mytadoba.mahaforest.gov.in) ऑनलाईन आरक्षणाची सुविधा देण्यात आली होती.
कार्यक्रमात कोर क्षेत्रातील ९६ मचानांवर प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी, तर बफर क्षेत्रातील ८१ मचानांवर एकूण १६२ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. निसर्गप्रेमींना विविध वन्यप्राण्यांचे थेट निरीक्षण करत निसर्गाशी जवळीक साधण्याची अनोखी संधी मिळाली.
वन्यजीव निरीक्षणाचा तपशील (कोर + बफर क्षेत्र):
वाघ: (कोर ३९ + बफर २४) ६३
बिबट: (कोर ९ + बफर ४) १३
अस्वल: (कोर ५० + बफर ४३) ९३
रानकुत्रा : (कोर ८६ + बफर १०) ९६
रानगवा: ५८२
चितळ: १७३७
सांबर: ५५३
माकड: ८५७
नीलगाय: ८७
मोर: ५५१
रानडुक्कर: ३८१
मुंगूस, चौशिंगा, ससा, सायाळ, रानमांजर, चिंकारा, उडती खार, उदमांजर, जवादी मांजर, भेडकी, चांदी अस्वल, तडस, मगर व इतर प्राणी: एकूण ५५०२ प्राणी निरीक्षित
संपूर्ण उपक्रमात सहभागी झालेले क्षेत्र:
कोर क्षेत्र: मोहर्ली, ताडोबा, कोळसा, कोलारा, कारवा
बफर क्षेत्र: पळसगाव, चंद्रपूर, मूल, शिवणी, खडसंगी, मोहर्ली
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि वन्यजीव रक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये निसर्गप्रेमाची भावना वृद्धिंगत झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असे प्रतिपादन वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांनी केले.
