
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात ६५ वर्षीय वृद्ध महिला कचराबाई भरडे यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज दि.१४ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून, मागील चार दिवसांतील वाघाचा हल्ल्याची ही पाचवी घटना आहे.
कचराबाई भरडे या तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. याच दरम्यान झुडपातून अचानक वाघ बाहेर आला आणि त्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या व जागीच त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
तेंदूपत्ता हे ग्रामीण भागातील नागरिकांचे उन्हाळ्यातील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत जंगलात वाघांची संख्या वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर होत चालला आहे.
ही घटना केवळ अपघात नाही, तर एक इशारा आहे – माणूस आणि वन्यजीव यांच्यातील अंतर झपाट्याने कमी होत चालले आहे. वन विभाग व प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
