
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळ विरखल परिसरात आज दि. 04 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
पांडुरंग भिकाजी चचाने (वय अंदाजे ५५), रा. पाथरी, हे सकाळी आपल्या शेतात धान पिकातील निंदणाचे काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळाजवळील असोला-मेंढा नहरालगतच्या शेतात ही घटना घडली.
हल्ल्यानंतर वाघाने चचाने यांना फरफटत नेले व जागीच ठार केले. परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
सदर भागात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच याच परिसरात एका वाघिणीने अलीकडेच बछड्यांना  जन्म दिल्याची माहिती वनविभागाकडून समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात वाघाचा वावर अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
शेतीचा मुख्य हंगाम सुरू असताना वाघाच्या सततच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गंडाटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्याचे सांगितले आहे.
.


 
                