
चंद्रपूर :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परीक्षेत्रामध्ये जैवविविधतेत मोलाची भर घालणारी एक ऐतिहासिक आणि उल्लेखनीय घटना घडली आहे. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी, नेहमीप्रमाणे गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी, कोळसा परीक्षेत्र तसेच वन्यजीव अभ्यासक रुंदन कातकर यांनी कोळसा कुरण भागात “युरोपियन रोलर” (Coracias garrulus) हा स्थलांतरित आणि आकर्षक निळ्या रंगाचा पक्षी पाहिला.
या पक्ष्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दर्शन झाल्याची ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
युरोपियन रोलर हा पक्षी मुख्यत्वे युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागात आढळतो. भारतात तो फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत नाही, मात्र अल्पकाळासाठी काही निवडक ठिकाणी त्याची नोंद झाली आहे. ताडोबामध्ये झालेली ही पहिली नोंद पर्यावरण संवर्धन आणि पक्षीनिरीक्षकांसाठी अत्यंत आनंददायी आणि गौरवास्पद घटना आहे.
हा पक्षी साधारण २९ ते ३२ सें.मी. लांबीचा असून, त्याचा रंग आकर्षक निळा व पंखांवर तपकिरी झाक असलेला असतो. तो मुख्यत्वे मोठे कीटक, सरडे आणि लहान प्राणी पकडतो. त्याचे स्थलांतर पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या काळात होते.
ताडोबा जंगलातील समृद्ध अधिवास आणि विविध परिसंस्था अशा स्थलांतरित पक्ष्यांना थांबण्यासाठी आदर्श वातावरण उपलब्ध करून देतात.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पक्षिजीवनात झालेली ही नवी भर, प्रकल्पाच्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद ठरली आहे.
संक्षिप्त वैशिष्ट्ये :
प्रजाती: Coracias garrulus
कुटुंब: Coraciidae
रंग: निळा आणि तपकिरी
लांबी: २९–३२ सें.मी.
पंख पटी: ५२–५८ सें.मी.
आवाज: कर्कश
मराठी नाव: युरोपियन नीलपंख
