पक्षी शिक्षण व संवर्धनासाठी CIBA चा ताडोब्यात पुढाकार

0
184

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):

ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक व पक्षी मित्रांसाठी पक्षी संवर्धन विषयक एक विशेष कार्यशाळा दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आगरझरी येथील कॅम्पिंग साईटच्या ऑडिटोरियममध्ये यशस्वीपणे पार पडली.

या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना पक्ष्यांची ओळख, त्यांची जीवनशैली तसेच घरटी बांधण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कोणता पक्षी कोणत्या प्रकारच्या झाडावर घरटे बांधतो, याबाबतही उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. ** प्रोजेक्टर च्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले.

यावेळी सन २०१७ साली स्थापन झालेल्या ‘सेंट्रल इंडिया वर्ल्ड अकॅडमी’ (CIBA) या संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली.

ही संस्था पक्षी शिक्षण, पक्षी संवर्धन आणि पक्षी रेस्क्यू या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यरत असलेले सर्व सदस्य यांत्रिकी अभियंते असून, त्यांच्या सोबत रसायन उद्योगातील सल्लागार, सॉफ्टवेअर अ‍ॅप आणि कोड बिल्डर विकसित करणारी टीम देखील कार्यरत आहे.

संस्थेचे सर्व सदस्य पक्षीनिरीक्षणाचे शौकीन असून त्यांच्याकडे विविध अधिकृत प्रमाणपत्रे आहेत. “आज एखाद्या पक्ष्याची मदत करतो, उद्या आणखी एका पक्ष्याच्या संवर्धनाची संधी मिळते,” या भावनेतूनच संस्था कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संस्थेमार्फत पक्षी शिक्षण, पक्षी संवर्धन, पक्षी रेस्क्यू तसेच प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवले जातात. संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल पिंपळापुरे असून ते ७२ वर्षांचे आहेत आणि वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत.

यावेळी संस्थेचे सदस्य नितीन मराटे यांनी माहिती देताना सांगितले की, ते जीएसटी व कस्टम्स सल्लागार असून पक्ष्यांप्रती असलेल्या विशेष प्रेमामुळे या कार्यात सहभागी झाले आहेत. “सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास पक्षी आणि निसर्गाचे संवर्धन निश्चितच शक्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.

भूतकाळातील जंगलांची स्थिती आणि आजच्या परिस्थितीची तुलना करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी भारतात मोठ्या प्रमाणावर जंगले आणि लहान गावे होती. नैसर्गिक आपत्तींचा जंगलांवर परिणाम होतो, मात्र पक्षी हे निसर्गातील अत्यंत सक्षम घटक आहेत. त्यामुळे कोणताही भय न बाळगता निसर्ग व पक्ष्यांच्या रक्षणासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे, श्रीधर बालपाने तसेच वनरक्षक आरती एडलावार, सिद्दिकी मॅडम  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here