सामूहिक वनहक्क ग्रामसभा व स्वयंसेवी संस्था राज्यस्तरीय प्रतिनिधी मेळाव्याचे आयोजन – मा. खा. शरद पवार करणार मार्गदर्शन

0
39

वर्धा (सेवाग्राम) :

सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींचा राज्य स्तरिय मेळावा दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी गांधी आश्रम, सेवाग्राम, वर्धा येथे सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात सामुहिक वनहक्क व उपजिविका, वन व जल संधारण यावर झालेले कार्य, अडचणी व उपाय योजना यावर चर्चा होणार आहे.
राज्य पातळीवर एकत्र कार्य करण्याकरीता याद्वारे सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे, हा या मागील हेतु आहे. तत्पूर्वी दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान विदर्भातील सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ व संस्था प्रतिनिधींची सभा देखील गांधी आश्रम, सेवाग्राम, वर्धा येथे नियोजित आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जेष्ठ व आदरणीय नेते मा. खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
तसेच सामुहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले जेष्ठ व अनुभवी दिलीप गोडे, श्रीमती प्रतिभा शिंदे, अँड . पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे देखील प्रामुख्याने उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे मेळाव्यात विदर्भ, खानदेश, कोकण या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी व त्यांचेसोबत कार्यरत खोज, व्हीएनसीएस, जीएसएमटी, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यु, संदेश या संस्थांचे प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबर, धुळे या जिल्ह्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ७००-८०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यात वनहक्क कायदा ,२००६ व नियम २००८ द्वारा जवळपास ७००० गावांना ३० लाख एकर वन जमिनीवर व जल स्त्रोतांवर सामुहिक हक्क प्रदान करण्यात आले आहेत. १३-१४ लाख कुटुंब व ६०-७० लाख नागरिकांना वनांवर स्वामित्व हक्क मिळाले आहेत. यांतील बहुसंख्य नागरिक आदिवासी व गरीब वन निवासी आहेत व त्यांची उपजिविका शेती आणि जंगलातील वनउपज (तेंदु पत्ता,बांबु,मोह
फुले, आवळा,हिरडा/ बेहडा व इतर) यावर अवलंबून आहे. जल, जंगल व जमिन याचे एकत्रित व सामुहिक व्यवस्थापन केले तर मोठ्या प्रमाणात या गावातील नागरिकांना आर्थिक लाभ होईल व रोजगार निर्माण होईल. विदर्भ उपजिविका मंच व सर्व मित्र संस्था विदर्भातील १००० पेक्षा अधिक गावांमध्ये कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे खानदेश उपजिविका मंच १०० चे वर तर कोकण उपजिविका मंच जवळपास २०० गावांत कार्यरत आहेत.

सामूहिक वनहक्क परिषदेमध्ये ग्रामसभांचे वन व जलसंधारण, उपजिविका, वनउपज व शेती यात झालेली विकास कामे, शासकीय योजनांचे अभिसरण, सामुहिक वनहक्क व उपजिविका, ग्रामसभांचे महासंघ व शासनासोबत सुसंवाद, यावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व त्याकरीता करावयाची उपाययोजना यावर चर्चा करून निर्णय घेतले जातील.

मेळाव्यात चर्चासत्रादरम्यान वनहक्क, वन व जल संधारण या विषयांवर उत्तम कामे झालेल्या गावांचे प्रतिनिधी आपले मनोगत व्यक्त करतील. तसेच व्हिडिओ व प्रोजेक्टर सादरीकरण, प्रदर्शनी आणि जेष्ठ व अनुभवी स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here