ताडोबाच्या महिला प्रसाधनगृहात फोर्स्टन मांजऱ्या सापाची (Forsten’s Cat Snake) एन्ट्री – सर्पमित्राच्या सतर्कतेने टळला अनर्थ

0
397

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडा गेटजवळील महिला प्रसाधनगृहात एका फोर्स्टन मांजऱ्या (Forsten’s Cat Snake) या निमविषारी सापाचे दर्शन झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सर्पमित्राच्या सतर्कतेमुळे हा साप सुरक्षितपणे पकडून निसर्गात परत सोडण्यात यश आले.

पर्यटक खातोडा गेटवर थांबले असताना काही महिला पर्यटक महिला प्रशासनगृहात गेल्या आणि त्याठिकाणी त्यांना साप दिसला. याची तत्काळ माहिती वनविभागाला देण्यात आली. क्षेत्र सहाय्यक नन्नावरे यांनी लगेचच सर्पमित्र जगदीश पेंदाम यांच्याशी संपर्क साधला.
सर्पमित्र पेंदाम यांनी घटनास्थळी दाखल होत सर्पाला कुशलतेने पकडले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. पकडल्या सापाची लांबी चार फूट असून रुंदी जवळपास दीड इंच होती.

फोर्स्टन मांजऱ्या – एक दुर्मिळ आणि निमविषारी साप

फोर्स्टन मांजऱ्या हा साप निमविषारी असून माणसासाठी घातक नसतो. त्याची लांबी ६ ते ७ फूट पर्यंत असते. याच्या अंगावर तपकिरी किंवा राखाडी रंगाचे आडवे पट्टे, चौकोनी नक्षी असते.
डोक्यावर गडद काळा ठिपका आणि मानेपर्यंत जाणारी काळी रेषा असते. याचा अधिवास प्रामुख्याने पश्चिम घाट, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमालयीन प्रदेशात आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात आढळणं हे दुर्मिळ मानलं जातं.

प्रशासनाचे सहकार्य

संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत ताडोबा वनपरिक्षेत्राचे अधिकारी चिवंडे, क्षेत्र सहाय्यक नन्नावरे, वनरक्षक झोनकले, तसेच वन कुटीतील मजूर वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वन्यजीव सुरक्षित तर आपण सुरक्षित!

साप दिसल्यास घाबरून न जाता वनविभाग किंवा स्थानिक सर्पमित्राशी त्वरित संपर्क साधावा. सजीवांची सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here