
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या मोहर्ली गेट येथे वनविभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मोहर्ली येथील ऑडिटोरियम सभागृहात पार पडले.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन टोरेंट लॅब, चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी टोरेंट लॅब तर्फे श्याम गोटनवार, अदनान शेख आणि ताहेर शेख यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी प्रक्रिया पार पाडली.

या कार्यक्रमाला वनविभागाचे मोहर्ली (कोर) चे क्षेत्र सहाय्यक विलास सोयाम तसेच मोहर्ली, खुटवंडा, नवेगाव, कोलारा, झरी आणि पांगडी या कोर क्षेत्रातील पर्यटक मार्गदर्शक उपस्थित होते. याशिवाय वन विभागाचे चालक आणि वनमजूर यांनीही या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.


शिबिरादरम्यान सर्व सहभागींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले असून त्या आधारे त्यांच्या आरोग्याची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे अहवाल दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिरामुळे वन विभागातील कर्मचारी, चालक आणि पर्यटक मार्गदर्शक यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होण्यास मदत होणार असून अशा उपक्रमांचे सर्वांनी स्वागत केले.



