स्वयंसेवी संस्थांचे मायाजाल

0
400

*स्वयंसेवी संस्थांचे मायाजाल*

भारत हा महाकाय लोकसंख्येचा देश आहे.७० वर्षात विविध सरकारे आली.परंतु अजूनही निम्म्या लोकसंख्येच्या प्राथमिक गरजाही आपण पूर्ण करु शकलो नाही.पक्ष कोणताही असो,ते निवडणूक जिंकता येतील अशा खोट्या आश्वासनांवरच लक्ष केंद्रित करतात.निवडणूका संपल्या की मग जनतेला वाऱ्यावर सोडले जाते.अशावेळी सरकार व जनता यांच्यामधे जी पोकळी निर्माण होते,ती भरुन काढण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था (NGO) पुढे येतात.सरकार सोबत मध्यस्तांच्या माध्यमातून संपर्क साधतात.तुम्हाला अधिक वेळ नसल्यामुळे आम्ही तुमच्या वतीने जनतेची सेवा करतो,सहकार्य करतो,मदत पुरवितो,त्यांच्या समस्या,अडचणी,प्रश्न सोडवितो अशी बतावणी करतात.आम्हाला फक्त सरकारचे आर्थिक सहकार्य आणि पाठबळ हवे अशी विनंती करतात.येथूनच गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांचा उदय होतो आणि हळूहळू त्याचे रुपांतर कार्पोरेट समाजसेवेत होते.

आपल्या देशात अशा स्वयंसेवी संस्थांची (NGO) संख्या प्रचंड आहे.काही समाजसेवी संस्थांचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.त्यांनी आपल्या क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले व समाजासमोर चांगले आदर्श निर्माण केले आहे.परंतु अशा स्वयंसेवी संस्थांची संख्या अत्यल्प आहे.याउलट सरकारी अनुदानाचा लाभ घेवून स्वतःंचे आर्थिक हित साधणाऱ्यांची संख्या मात्र प्रचंड आहे.वन्यजीव व जंगलाच्या संबंधित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तर एखाददुसरा अपवाद वगळता फारच बोगस व भ्रष्ट आहे.काम कमी आणि प्रसिध्दी जास्त असा यांचा खेळ असतो.जंगलाशी संबंधित प्रश्न,समस्या सोडविण्याऐवजी स्वतःंचे खिसे भरण्यातच या स्वयंसेवी संस्था अग्रेसर असतात.मेळघाट मधील दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात या स्वयंसेवी संस्था एकदम गप्प आहेत.एखादे हरीण मेले तर आकांडतांडव करणाऱ्या या तथाकथित स्वयंसेवी संस्था एका तरुण व कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेचा जीव गेल्यावर कुठे साधा निषेधही नोंदवत नाही यावरुन यांचे खरे धंदे काय आहेत हे लक्षात येते.अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करुन कागदोपत्री कामे दाखवायची आणि सरकारचा निधी गडप करायचा,त्यातील काही वाटा मोठ्या अधिका-यांंना द्यायचा असे हे षडयंत्र आहे.मेळघाटच्या अधिकाऱ्यांसोबत *आर्थिक मैत्री* करुन एकमेकांचे भ्रष्टाचार व काळे धंदे दाबायचे,घनदाट जंगलातील आलिशान रेस्ट हाऊस मधे *सर्वच प्रकारची* मजा करायची आणि आदिवासींना मात्र त्रास देवून त्यांच्या मूळ ठिकाणावरुन निर्वासीत करायचे असे हे खतरनाक रॕकेट आहे.

मेळघाटमधे मोठ्या संख्येने सरकारी व परदेशी अनुदान मिळविणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था असतांना किती आदिवासींचे जीवनमान उंचावले आहे ? किती आदिवासी मुख्य प्रवाहात आले आहेत ? किती आदिवासींची मुले डाॕक्टर,इंजिनियर,प्राध्यापक,वकील,कलेक्टर,कमिश्नर,तहसिलदार व उच्च अधिकारी पदावर विराजमान झाली आहेत ? मग या स्वयंसेवी संस्थांना आदिवासींच्या उत्थानाकरिता सरकारकडून मिळणारा कोट्यावधींचा निधी कुठे गायब होतो ? स्वयंसेवी संस्थांच्या नावावर समाजसेवकांची एक नवी कार्पोरेट हाय प्रोफाईल जमात आपल्या देशात जन्माला आली आहे.अधिकारी व राजकारणी यांच्याशी जवळीक साधून व त्यांची लाचारी पत्करुन हे स्वयंसेवी लोक समाजसेवक म्हणून मिरवितात.समाजामधे मिळत असलेला मानसन्मान,आदर,पुरस्कार यामुळे या लोकांची एक वेगळी सामाजिक प्रतिमा तयार होते.त्यातूनच त्यांचा अहंकार,गर्व व महत्वाकांक्षा वाढत जाते आणि सामाजिक काम मागे पडून फक्त आणि फक्त प्रसिध्दी,पैसा,प्रतिष्ठा आणि स्वतःंच्या कुटुंबाचे भले करण्यासाठी तथाकथित सामाजिक कार्याचे ढोंग सुरु होते.यामधे कोट्यावधींची हेराफेरी आहे.अनेक समाजसेवक तर ठेकेदारी करतात.अधिकाऱ्यांसोबत टक्केवारी ठरवून हरामाची कमाई करतात.त्यातूनच मग शिवकुमार व रेड्डी सारखे विकृत व नालायक अधिकारी सर्वसामान्य लोकांवर अन्याय करतात.सर्वसामान्यांना वन कायद्यांच्या नियमांचा धाक दाखवून,आदिवासींवर अन्याय अत्याचार करुन स्वतःं मात्र वनखात्याचे सर्व नियम हे अधिकारी व कार्पोरेट समाजसेवी पायदळी तुडवितात आणि जंगली सौंदर्याचा सरकारी खर्चाने यथेच्छ आस्वाद घेतात.आलिशान गाड्या,बंगले यामधे सरकारी पैशावर मौजमजा करतात.सर्वच ठिकाणी ही अवस्था आहे.

चंद्रपूर,गडचिरोली या भागातही आदिवासींच्या नावावर कार्पोरेट समाजसेवकांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. सरकारी पैसा व लोकवर्गणी यांचा महापूर आहे.आदिवासी मात्र अजूनही मातीच्या झोपडीतून सिमेंटच्या घरात येवू शकले नाही.अशाच पैशाच्या मोहातून वादविवाद निर्माण झाले व आमटे परिवारातील एका डाॕक्टर महिलेने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती.त्यामुळे सगळीकडे सावळा गोंधळ सुरु आहे.आदिवासी जिथे आहे तिथेच आहे.त्यांच्या जगण्यामरण्यात काहीच फरक पडलेला नाही.परंतु त्यांची सेवा करण्याच्या नावावर अर्धवट खादीचे कपडे घालून,खुरटलेली पांढरी दाढी वाढवून व जंगलातील फाईव्ह स्टार घरात राहून कोट्यावधी रुपये कमावण्याची ही फारच आगळीवेगळी समाजसेवा आहे.तेव्हा अशा समाजसेवी लोकांचा भंडाफोड करणे व त्यांचे अनुदान बंद करुन खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी जनतेनेच आवाज उठविणे गरजेचे आहे.अन्यथा स्वयंसेवी संस्थाचे हे भ्रष्ट मायाजाल निसर्ग निर्मित जंगल व जंगली संपदा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.


प्रेमकुमार बोके
अंंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here