
जिल्हा प्रतिनिधि (यश कायरकर) :
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटमधील कारगाटा-ठकाबाई तलाव परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी (दि. १० मई २०२५) रोजी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून, एकाच वेळी तीन महिलांचा बळी गेल्याची ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या महिला परत न आल्याने खळबळ
मेंढा (माल) येथील तीन महिला सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता तोडण्यासाठी डोंगरगाव बिटच्या जंगलात गेल्या होत्या. मात्र, दुपारपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी शोध घेतला. वनविभागाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केल्यानंतर त्या महिलांचे मृतदेह जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.
मृत महिलांची नावे:
रेखा शालीक शेन्डे (वय ५५)
शुभांगी मनोज चौधरी (वय ३५)
कांता बुधाजी चौधरी (वय ६०)
यापैकी शुभांगी व कांता या सासू-सून असून एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
वाघिणीचा संशय – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
घटनास्थळी पट्टेदार वाघाचे ठसे आढळून आले असून, परिसरात वाघीण व बछड्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे डोंगरगाव बिट आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्ताची जोरदार मागणी केली आहे.
वनविभागाकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
तसेच ग्रामस्थानां तेंदू पत्ता संकलनच्या वेळेस नेहमी सतर्क राहण्यास वनविभाग सांगतं असते.
सदर घटनेत मृतकांच्या कुटुंबीयांना वन्यजीव नुकसान भरपाई अंतर्गत मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकाचवेळी तिघांचा मृत्यू – प्रशासनावर प्रश्नचिन्ह
एकाच दिवशी तीन निष्पाप महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. जंगलाच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघांची संख्या वाढत असताना मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग आणि प्रशासनाने अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
