
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (TATR) पद्मापूर गेटपासून मोहर्लीपर्यंत प्रत्येक शनिवार व रविवार मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. ताज्या माहितीनुसार, सप्ताहांताच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत या मार्गावर सुमारे 1000 चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची वर्दळ होत आहे. मोहर्ली परिसरातील ‘काळा पाणी’ भागात छोटी मधु वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे, त्यांना जवळून पाहण्याची उत्सुकता वाढल्याने ही गर्दी वाढत आहे.
पर्यटनामध्ये झालेली वाढ वनक्षेत्रासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी, यामुळे अनेक गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत.
सप्ताहांत होणाऱ्या गर्दीमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून, स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभाग यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पर्यटकांच्या गर्दीमुळे प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा प्रकार ताडोबाच्या पर्यावरणासाठी घातक ठरत असून, वाघांसह इतर वन्यजीवांसाठीही मोठा धोका बनत आहे. वाहनांच्या आवाजामुळे होणारा ध्वनीप्रदूषण आणि कचऱ्याची उपस्थिती यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनामध्येही बदल दिसून येत आहे.
वनविभाग या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सक्रिय आहे. PRT पथक व वनकर्मचाऱ्यांकडून गस्त वाढवण्यात आली असून, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. पद्मापूर गेटवरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पर्यायी उपायांवरही विचार सुरू आहे.
वनविभागाने पर्यटकांना आवाहन केले आहे की त्यांनी ताडोबाचे नियम पाळावेत, कचरा टाकू नये, वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि या अमूल्य जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे.
