
चंद्रपुर (मोहम्मद सुलेमान बेग):
चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष चिघळत असतानाच, दुसरीकडे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ताडोबाच्या पिपळगाव पिपीएफ परिसरात काल, १८ मे रोजी, सायंकाळी साधारण ५ वाजता वन कर्मचाऱ्यांना एक बैलबंडी संशयास्पद अवस्थेत आढळून आली.
सदर बंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड आढळून आले. घटनास्थळी वन अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत चार जणांना अटक केली आणि त्यांच्यासोबत असलेली बैलबंडी जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी ताडोबा कोअर वन्यजीव परीक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले आहे. या पूर्वी देखिल अशीच एक घटना झाली होती.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलात आग लागण्याचा धोका अधिक असल्याने वन विभागाकडून दिवसरात्र गस्त सुरु होती. याच दरम्यान ही कारवाई यशस्वी ठरली.
दरम्यान, या घटनेनंतर गावात चर्चा सुरू झाली आहे की कोअर क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद असताना तिथून सागवानाची तस्करी कशी काय शक्य झाली? स्थानिकांचे म्हणणे आहे की, यामध्ये काही वन कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतीशिवाय ही तस्करी अशक्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
