तेंदूपत्ता संकलनादरम्यान वाघाच्या हल्ल्यांत ८ महिलांचा मृत्यू; वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

0
250

चंद्रपुर (मोहम्मद सुलेमान बेग):
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या आहेत. या भीषण हल्ल्यांमध्ये आतापर्यंत आठ महिलांनी आपला जीव गमावला आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


ही परिस्थिती लक्षात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) अधिकारी संतोष थीपे यांनी वडोली, पदमापूर, आगरझरी, भामडेली, सीतारामपेठ, मुधोळी आणि टेकाळी या गावांमध्ये जाऊन तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिला समूहांशी थेट संवाद साधला. त्यांनी स्थानिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि जंगलात अत्यंत सावधगिरीने वागण्याचे आवाहन केले आहे.
वनविभागाने तेंदूपत्ता संकलनासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेतच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, कुणीही एकटे जंगलात जाऊ नये, समूहातच राहून काम करावे. वन्यप्राण्यांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता असलेल्या लाल व चटक रंगाच्या कपड्यांचा वापर टाळावा. तसेच, काम सुरू करण्यापूर्वी परिसराची पाहणी करणे व सतत आवाज करत राहणे यामुळे प्राण्यांना मानवी हालचालींचा इशारा मिळतो, त्यामुळे संभाव्य टक्कर टाळता येऊ शकते.

ही सूचना देताना मोहर्ली रेंजचे राउंड ऑफिसर एस. जुमडे, वनरक्षक जनबंदू तसेच सीतारामपेठ येथील PRT (प्रोटेक्शन रॅपिड टीम) चे सदस्य उपस्थित होते.

वनविभागाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, ग्रामस्थांनी जंगलात काम करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप करताना काळजीच जीवनरक्षक ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here