बॉटनिकल गार्डनचे काम जलदगतीने पूर्ण करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

0
313

आ. मुनगंटीवार यांनी केली बॉटनिकल गार्डनची पाहणी

२८ फेब्रुवारी रोजी वनविभागांच्‍या प्रधान सचिवांसोबत होणार झूम बैठक

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍हयातील भौगोलिक क्षेत्र उत्‍तम निसर्ग वन आणि जैव विविधतेने संपन्‍न आणि समृध्‍द असे क्षेत्र आहे. या निसर्ग वैभवाला बॉटनिकल गार्डनमुळे नवसंजीवनी मिळणार आहे. बंगलोरच्‍या धर्तीवर उभारण्‍यात येणा-या या बॉटनिकल गार्डनचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-‍बल्‍लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक उभारण्‍यात येणा-या बॉटनिकल गार्डनची पाहणी केली. याठिकाणच्‍या विविध कामांचा आढावा त्‍यांनी घेतला. जी कामे निधी अभावी प्रलंबित आहेत त्‍याची माहिती अधिका-यांकडून जाणून घेतली. हे बॉटनिकल गार्डन देशातील सर्वात उत्‍तम गार्डन ठरावे तसेच वनस्‍पती शास्‍त्राचा अभ्‍यास करण्‍यासाठी खुले विद्यापीठ ठरावे यादृष्‍टीने वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांनी प्रयत्‍नांची शर्थ करावी असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. या परिसरात प्रशासकीय इमारत, वनविभागाचे कार्यालय, प्रदर्शन केंद्र, भूमीगत संग्रहालय, प्‍लॅनेटोरियम, फुलपाखरू उद्यान, विज्ञान केंद्र, मत्‍स्‍यालय, उपहारगृह, विज्ञान व उत्‍क्रांती पार्क या सर्व इमारतींचे निर्माणकार्य जवळपास शेवटच्‍या टप्‍प्‍यावर आहे. या बॉटनिकल गार्डनला पूर्णत्‍वाला नेण्‍यासाठी आणखी जवळपास रू.२० कोटी लागणार असून त्‍याची मागणी संबंधित विभागाकडे केली असल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले.

या प्रकल्‍पामुळे प्रत्‍यक्ष व नियमितपणे अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे. ज्‍यामुळे परिसरातील युवकांना व महिलांना याचा फायदा होईल. विद्युत व्‍यवस्‍थेकरिता सोलार सिस्‍टीम लावण्‍याचे नियोजन करावे व त्‍याचे अंदाजपत्रक तयार करून त्‍वरीत विभागाकडे पाठवावे, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. देशातील उत्‍कृष्‍ट बॉटनिकल गार्डन तयार होण्‍याच्‍या दृष्‍टीने अधिका-यांनी व कंत्राटदाराने तसेच विविध संस्‍थांनी केलेल्‍या मेहनतीचे कौतुकही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

या विषयासंदर्भात २८ फेब्रुवारी रोजी सायं. ४.०० वा. वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक नागपूर, चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाचे संबंधित अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व वरिष्‍ठ अधिकारी यांची झूम मिटींग घेण्‍यात येणार असून या बैठकीत आवश्‍यक बाबींवर चर्चा करण्‍यात येईल असे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

या पाहणी दौ-यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार, उपअभियंता श्री. मेंढे, शाखा अभियंता अनिरूध्‍द विजयकर, विद्युत विभागाचे अभियंता येरगुडे, वनपाल नरेश भोवरे, आर्कीटेक्‍ट राहूल धुलप, कंत्राटदार जतीन पटेल, अभियंता तौषीक, किशोर पंदिलवार, राहूल टोंगे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here