ताडोबा परिसरातील स्थानिक होमस्टे धारकांना प्रोत्साहन

0
233

मोहर्ली व कोलारा येथे क्रुझर वाहन सुविधा – अटी व शर्ती निश्चित

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :

ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांना पर्यटनातून अधिकाधिक लाभ मिळावा, या उद्देशाने होमस्टे धारकांसाठी क्रुझर वाहन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात होमस्टे (Home Stay) चालविण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती निश्चित करण्याबाबत दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मा. उपसंचालक (कोअर) ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर श्री. आनंद रेड्डी येल्लू (भा.व.से.) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी

श्री. अनिरुध्द अनिल ढगे सहाय्यक वनसंरक्षक (ज. जं. कॅम्पा), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, श्री. विवेक रमेश नातु सहाय्यक वनसंरक्षक (सं.घ.), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, कर्मचारी तसेच ताडोबा परिसरातील विविध गावांतील होमस्टे धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सखोल चर्चा करून होमस्टे धारकांसाठी पात्रता निकष, सुविधा, पर्यावरणीय जबाबदाऱ्या तसेच क्रुझर वाहन वापराबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.

होमस्टे धारकांसाठी मुख्य अटी व शर्ती

बैठकीत ठरविण्यात आलेल्या अटींनुसार होमस्टे धारक हा स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून, संबंधित होमस्टे किमान दोन वर्षे कार्यान्वित असणे बंधनकारक राहणार आहे. होमस्टे धारक स्वतः चालक-मालक असावा व त्याचे कुटुंबीय दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष सहभागी असणे आवश्यक ठरविण्यात आले आहे.होमस्टे ही मालमत्ता स्वतःच्या मालकीची असावी, ती भाडे अथवा लीजवर दिलेली नसावी तसेच ती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनावर भर

प्रत्येक होमस्टेमध्ये किमान 1 ते कमाल 5 अतिथी कक्ष असणे, स्वच्छ खोल्या, स्वच्छतागृहे, पार्किंग सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक यंत्र, प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध असणे आवश्यक राहणार आहे.पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेता सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णतः बंदी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर तसेच जैविक कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

क्रुझर वाहन सुविधा

बैठकीतील निर्णयानुसार मोहर्ली येथे एक व कोलारा येथे एक क्रुझर वाहन दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पासून होमस्टे धारकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वाहने रोटेशन पद्धतीने, स्लॉटनिहाय वापरासाठी देण्यात येतील.तीन किंवा त्यापेक्षा कमी खोल्या असलेल्या होमस्टे धारकांना एकत्रित स्लॉट देण्यात येणार आहे.

नियमभंगास कठोर कारवाई

पर्यटकांनी होमस्टेमध्ये बुकिंग करून प्रत्यक्षात इतर रिसॉर्ट अथवा निवासस्थानी वास्तव केल्याचे आढळून आल्यास संबंधित होमस्टे धारकास तीन वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल व क्रुझर बुकिंग सुविधा पूर्णतः रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

तपासणी व मूल्यांकन

वनपरिक्षेत्र अधिकारी मोहरली व कोलारा यांनी संबंधित होमस्टे अटी व नियमांची पूर्तता करतात की नाही याची तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या व पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविणाऱ्या होमस्टे धारकांना पुढील वर्षी अतिरिक्त स्लॉट देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

ही योजना स्थानिकांना रोजगार, उत्पन्न व पर्यटनातील सहभाग वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here