जंगल वाचवायचे असेल, तर वाघ वाचविणे आवश्यक: उपवनसंरक्षक शर्मा विविध उपक्रमांनी साजरा झाला जागतिक व्याघ्रदिन

0
458

धानोरा  : एकूणच अन्नसाखळीत वाघ हा सर्वोच्च स्थानी आहे. वाघ जंगलातील तृणभक्ष्यी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे जंगलातील वृक्ष, वनस्पती योग्य पद्धतीने वाढू शकतात. वाघाच्या भीतीने चोरटे शिकारी, अवैध वृक्षतोड करणारे जंगलात जात नाहीत. त्यामुळे वाघ एक प्रकारे जंगलाचा आणि निसर्गाचा रक्षक आहे. त्यामुळे जंगल वाचवायचे असेल, तर आपल्याला वाघ वाचवायलाच हवा, असे प्रतिपादन गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी केले.जागतिक व्याघ्रदिन व आझादी का अमृत महोत्सव दि. २९ जुलै २०२२ शुक्रवार रोज धानोरा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा बोलत होते. तसेच या कार्यक्रमाला विभागीय वनाधिकारी जमीर शेख, संलग्न वनाधिकारी हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, धानोरा नगरपंचायतीच्या अध्यक्ष पौर्णिमा सयाम आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमात सर्वप्रथम वाघाच्या हल्ल्यात निधन झालेले धुंडेशिवणी येथील नीलकंठ मोहुर्ले, दिभणा येथील खुशाल निकुरे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  

वनाधिकारी हरवीर सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनात जागतिक व्याघ्रदिनाचे महत्त्व विशद करताना निसर्ग व्यवस्थेत वाघाचे महत्त्व सविस्तर सांगितले व तसेच आपल्या घरात येणारे पाणी एखाद्या नदीतून येते. ती नदी एखाद्या जंगलातूनच उगम पावते. म्हणून आपल्याला पिण्याचे पाणी हवे असेल, तर जंगलाचे रक्षण करावे लागेल म्हणजे पर्यायाने वाघाचे रक्षण करावे लागेल, असे ते म्हणाले.

मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी वाघाच्या जगभरातील ९ उपप्रजाती, वाघाची वैशिष्ट्ये, त्याची शिकार करण्याची पद्धत, जंगलात फिरताना वाघाशी सामना झाल्यास काय करायचे, वाघाचे कोणते गुण आत्मसात करण्यासारखे आहेत, अशी विविध प्रकारची रंजक माहिती दिली.

प्रास्ताविक मुरूमगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भंडारी यांनी केले तर संचालन क्षेत्र सहायक सुनील पेंदोरकर, तर आधार वाय. पी. राऊत यांनी मानले.या कार्यक्रमासाठी धानोरा तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

जनजागृती रॅलीसह रक्तदान शिबिर…जागतिक व्याघ्र दिनानिमित्त धानोरा तालुक्यातील ६ वनपरिक्षेत्रांतील अधिकारी, कर्मचारी जसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच वनवसाहत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वितरण करण्यात आले व आपल्या उपक्षेत्रात/नियतक्षेत्रात वाघ संनियंत्रण तसेच वनसंवर्धन कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र वितरित करण्यात आले व त्यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम वक्तृत्वा बद्दल प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र वितरित करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here