
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील कोलारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, रिसॉर्ट आणि होमस्टे चालकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात, अशा ठिकाणी सतत वीज खंडित होणे ही लाजीरवाणी बाब आहे, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
सेवेचा अभाव – रात्री वीज गेल्यास लाईनमन उपलब्ध नसतो
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर रात्री वीज गेली तर ती सकाळपर्यंत येत नाही. लाईनमन सकाळीच येतात आणि रात्री सेवा देण्यास नकार देतात. “सेवा देणे ही त्यांची जबाबदारी असतानाही ते त्याकडून पळ काढतात,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वीज खंडित झाल्याने उपकरणे खराब, अपघाताचा धोका
रोज अनेक वेळा वीज गेल्यामुळे रिसॉर्टमधील इलेक्ट्रिक उपकरणे वारंवार बिघडत आहेत. “आमचे दोन AC खराब झाले आहेत. एकदा शॉर्टसर्किटमुळे रिसोर्टच्या इलेक्ट्रिक रूमला आग लागली होती. मोठं नुकसान झालं, सुदैवाने जीवितहानी टळली,” असे बाघ कोठी वाइल्डलाइफ रिसॉर्टचे मालक म्हणाले.
थोडीशी हवा चालली तरी वीज बंद – कोलारा मध्ये काही रिसोर्टला ‘ब्लॉक लिस्ट’ मध्ये
थोडीशी हवा चालली तरी कोलारा भागातील वीजपुरवठा खंडित केला जातो. कोलारा गेट परिसरातील रिसोर्ट धारकाचे मोबाईल नंबर ‘ब्लॉक लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे, मोबाईल केले तर त्याचे उत्तर दिले जात नाही तसेच या भागाला प्राधान्याने वीजपुरवठा केला जात नाही. येथे वनविभागाचे कार्यालय आणि दोन-तीन रिसोर्ट्स असूनही दुर्लक्ष केले जात आहे. जुने ट्रान्सफॉर्मर आणि देखभालीतील हलगर्जीपणामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.
सौरऊर्जा असूनही वीजबिल वाढले – दरवाढीविरोधात कोर्टात याचिका
या भागातील काही रिसोर्ट मध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत, तरीही वीजबिलात मोठी वाढ झाली आहे. याबाबत विचारले असता MSEB ने सांगितले की, “पीक अवर्स मध्ये सौरऊर्जा पुरेशी काम करत नाही.” याच पार्श्वभूमीवर दोन-तीन रिसोर्ट मालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
रिसोर्ट मध्ये जनरेटरच्या वापरामुळे पर्यावरण धोक्यात
वारंवार वीज गेल्यामुळे रिसोर्ट्सना जनरेटर वापरावा लागतो. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण वाढत आहे. “वन क्षेत्राजवळ सतत प्रदूषण होत राहिल्यास जैवविविधतेचे रक्षण करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील,” असे एका पर्यावरण कार्यकर्त्याने सांगितले.
नागरिकांचीमागणी – MSEB ने तातडीने उपाययोजना करावी
या संपूर्ण पार्श्वभूमीवर कोलारा परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी MSEB व प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालून नियमित, सुरक्षित व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.
