सह्याद्री TARA ऑपरेशनला सुरुवात; ताडोबातील चार वाघांचा नवा प्रवास सह्याद्रीकडे!

0
287

चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)

महाराष्ट्रातील वाघ संवर्धन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत, “सह्याद्री TARA (Tiger Augmentation and Rehabilitation Action)” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चार वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघसंख्या वाढविणे, आनुवंशिक वैविध्य टिकवून ठेवणे, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील वाघ संवर्धनाला नवी दिशा देणे हा आहे. गेल्या काही वर्षांत सह्याद्रीतील वाघांची संख्या अत्यल्प झाली होती; अधिवास तुटक झाल्याने आणि प्रजननाच्या संधी मर्यादित राहिल्याने ही पुनर्स्थापना योजना आवश्यक ठरली.

या मोहिमेत महाराष्ट्र वन विभाग, TARA टीम, वन्यजीव संस्थान, देहरादून (WII) तसेच विविध तज्ज्ञ संस्थांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. वाघांना स्थलांतरापूर्वी वैद्यकीय तपासणी आणि विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, स्थलांतरानंतर त्यांना रेडिओ कॉलर लावून सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे.

सह्याद्रीकडे जाणारा हा प्रवास ‘चंदा’ नावाच्या साडेतीन वर्षांच्या वाघीणीपासून सुरू झाला आहे. बुधवारी उशिरा रात्री ताडोबाच्या अलिझांझा पर्यटन क्षेत्रातून तिला सुरक्षितपणे पकडून वन्यजीव रुग्णवाहिकेतून सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करत सह्याद्रीकडे रवाना करण्यात आले. ती आज 13 नोव्हेंबर 2025 रोजी गुरुवारी रात्री पर्यंत आपल्या नव्या अधिवासात दाखल होणार आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वीच ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पांतून आठ वाघ (तीन नर आणि पाच मादी) स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली होती. या आठ वाघांमध्ये ताडोबातील चार वाघ आणि पेंचमधील चार वाघांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेमुळे पश्चिम घाटातील सह्याद्री प्रदेशात वाघांच्या उपस्थितीला नवा बळकटी मिळेल आणि तेथील जैवविविधतेला पुनर्जन्म मिळेल. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास महाराष्ट्रातील इतर व्याघ्र प्रकल्पांसाठीही हे आदर्श ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here