
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली येथे ग्राम परिस्थितीकी कमिटी (EDC) व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहर्ली येथील माता मंदिर परिसरात हा उपक्रम पार पडला.

ग्राम परिस्थितीकी कमिटीने यावेळी १०० झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण केला. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याचा उद्देश या माध्यमातून साध्य झाला.

या कार्यक्रमाला मोहर्ली गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुनीता कातकर, ग्रामपंचायत सदस्य, वनपरिक्षेत्र अधिकारी (कोअर) अरुण गोंड, वन परिक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष तिपे, क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे व सोयाम, ग्राम परिस्थितीकी कमिटी अध्यक्ष संजय मोंढे व सर्व सदस्य, तसेच पर्यटक मार्गदर्शक अध्यक्ष विठ्ठल भोयर व सर्व गाईड, जीप्सी चालक-मालक संघाचे सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवर्ग, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीसाठी रॅली काढून गावात पर्यावरणाबाबत जनजागृती केली. या उपक्रमामुळे परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनीही भविष्यात झाडांचे संगोपन करण्याची ग्वाही दिली.


 
                