वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष तिपे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षीमित्रांकडून हरित शुभेच्छा!

0
784

चंद्रपूर :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष तिपे यांच्या वाढदिवसानिमित्त विंग्ज ऑफ ताडोबा या पक्षीप्रेमी ग्रुपच्या वतीने एक विशेष हरित उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मोहर्ली शेत परिसरातील कुपणाजवळ पक्ष्यांच्या अधिवास आणि खाद्य स्रोत वाढवण्यासाठी फळझाडांची लागवड करण्यात आली. या लागवडीत आंबा, जांभूळ, फणस, सीताफळ आणि पेरू या पक्ष्यांना आवडणाऱ्या फळझाडांचा समावेश होता.


या उपक्रमात पक्षी मित्र मोहम्मद सुलेमान बेग, सुमेध वागमारे, अजय पोद्दार आणि विपुल ढवले यांनी सक्रीय सहभाग नोंदवत विविध ठिकाणी झाडांची लागवड केली. या फळझाडांमुळे भविष्यात पक्ष्यांना नैसर्गिक अन्न आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी पक्षीमित्रांनी सांगितले की, “संतोष तिपे सर यांनी मोहर्ली बफर क्षेत्रात तसेच इरई धरण परिसरात पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी उपयुक्त झाडांची लागवड केली आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आम्हीही हा छोटासा उपक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला असून, ही आमच्या कडून त्यांना एक ‘हरित शुभेच्छा’ आहे.”

हा उपक्रम फक्त एक साजरा करणारा क्षण न राहता, पक्ष्यांच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन सकारात्मक पाऊल ठरेल, अशी आशा विंग्ज ऑफ ताडोबाने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here