
मोहर्ली : (मोहम्मद सुलेमान बेग)
वन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता मोहर्ली, सितारामपेठ व भामडेळी परिसरातील सर्व लहान-मोठ्या जनावरांना “चौकारा एफ.एम.डी.” (तोंड-खुर रोग प्रतिबंधक) लस देण्यात आली.
“एफ.एम.डी. लस” (Foot and Mouth Disease Vaccine) ही एक inactivated – म्हणजे निर्जीव विषाणूवर आधारित लस असून ती जनावरांच्या शरीरात रोग निर्माण न करता फक्त त्याविरुद्धची प्रतिकारशक्ती वाढवते. हा विषाणू प्रामुख्याने खुर असलेल्या जनावरांमध्ये — जसे की गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, डुक्कर व हरण — यांच्यामध्ये आढळतो.
हा उपक्रम मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. लाडे (पं. स. मोहर्ली), परिचर प्रकाश आकुलवार, तसेच वनमजूर उपस्थित होते. प्रकाश आकुलवार यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने घराघरांत जाऊन जनावरांचे लसीकरण केले.
या मोहिमेद्वारे ग्रामस्थांमध्ये जनावरांच्या आरोग्याविषयी जागरूकता आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.
स्वच्छता अभियान, बंधारा बांधणी आणि मॅरेथॉन द्वारे जनजागृती
वन्यजीव सप्ताहानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. टेकाडी गावात स्वच्छता अभियान, तर जुनोना परिसरात बंधारा बांधणीचे काम करण्यात आले.
याशिवाय, मोहर्ली (कोर) क्षेत्रातील पर्यटक मार्गदर्शक, ड्रायव्हर आणि वनकर्मचारी यांच्या सहभागातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. ही मॅरेथॉन मोहर्ली कोर गेटपासून भामडेळीपर्यंत (अंदाजे २ किमी) पार पडली.
या उपक्रमात मोहर्ली च्या सरपंच सौ. सुनीता कातकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने मार्गदर्शक, ड्रायव्हर, वनमजूर आणि कर्मचारी सहभागी झाले. या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश होता — “वन्यजीवांविषयी जनजागृती आणि संवेदनशीलता निर्माण करणे.”
हा उपक्रम मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी क्षेत्र सहाय्यक विलास सोयाम, शरद घागरगुंडे, तसेच वनरक्षक स्नेहा महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व उपक्रमांद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने वन्यजीव संरक्षण आणि ग्रामीण जनतेच्या आरोग्याबद्दलची जबाबदारी अधोरेखित केली.
जंगल आणि ग्रामसंवर्धन हातात हात घालून चालले पाहिजे, हा संदेश या उपक्रमांतून प्रभावीपणे देण्यात आला.
