ताडोबा बफर क्षेत्रातील भामडेली येथे 19 विद्यार्थी आजारी; तिघांची प्रकृती गंभीर

0
1123

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील भामडेली गावातील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी व्हिटॅमिनच्या गोळ्या सेवन केल्यानंतर 19 विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन टॅबलेट दिली जाते. मात्र, मागील काही आठवड्यांपासून गोळ्यांचे वितरण झाले नव्हते. दरम्यान, एका विद्यार्थिनीने शिक्षकांकडे व्हिटॅमिन टॅबलेट देण्याची मागणी केली असता संबंधित शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा-सहा गोळ्या देण्यास सांगितल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी त्या गोळ्या सेवन केल्या.

काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवले. एकूण 19 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांना सलाईन लावण्यात आली आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित व्हिटॅमिन गोळ्यांची तपासणी केली जाणार असून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here