
टाटा सुमो जप्त; वनगुन्हा दाखल
मोहर्ली :
मोहर्ली परिक्षेत्रातील पद्मापूर–मोहर्ली रस्त्यावर एका भरधाव वाहनाच्या धडकेत एक नर चितळ मृत्यूमुखी पडल्याची गंभीर घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता देवाडा अडेगाव येथील शेत मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो (MH-22/U-2369) मोहर्ली कडून देवाडा अडेगाव कडे जात असताना हा अपघात झाला.
भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमोने रस्ता ओलांडत असलेल्या चितळाला जोरदार धडक दिली.

धडकेत चितळ जागीच ठार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहन जप्त केले.
या प्रकरणी प्राथमिक अपराध सूचना (P.O.R.) क्रमांक 09642/241029/02/2025, दि. 15 नोव्हेंबर 2025 नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली हे करीत आहेत.
वनविभागाने यापूर्वीच पद्मापूर–मोहर्ली या संवेदनशील वनपरिसरातून 20 किमी/ताशी पेक्षा जास्त वेगात वाहन चालवू नये, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तरीसुद्धा अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्याने वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची खंत वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.




