ताडोबा कोअर क्षेत्र पर्यटकांसाठी खुले; मोहर्ली प्रवेशद्वारावर पूजा व ध्वजारोहणाने पर्यटन हंगामाचा शुभारंभ

0
311

मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग) :

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोअर क्षेत्र) आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले. मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ताडोबाच्या कोअर जंगलाचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडले गेले असून, यावेळी देश-विदेशातून आलेले निसर्गप्रेमी तसेच स्थानिक पर्यटक मोठ्या संख्येने वाघदर्शनासाठी उपस्थित होते.

या उद्घाटनावेळी वनविभागाने सर्व पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व मिठाई वाटप करून गोडीगुलाबी वातावरण निर्माण केले.

सफारी वेळा आणि नियमावली

ताडोबामध्ये सफारीसाठी दोन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सकाळची सफारी : सकाळी ६.०० ते दुपारी १०.००

दुपारची सफारी : दुपारी २.३० ते संध्याकाळी ६.३०

वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबामध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी लागू असून, रिसॉर्टमध्ये प्लास्टिकच्या बाटल्याही पूर्णपणे बंदीस्त आहेत.

नवीन निर्णयानुसार, क्रुझर वाहनातून सफारीसाठी प्रति व्यक्ती फक्त ₹ ७२० शुल्क आकारले जाणार असून, यामध्ये कॅमेरा चार्जेस पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.

या उद्घाटन प्रसंगी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी येल्लू, सहाय्यक वनसंरक्षक व्हि. नातू, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. गोंड, क्षेत्र सहाय्यक विलास सोयाम, शरद घागरगुंडे, कोरवते, तसेच वनरक्षक स्नेहा महाजन, मरस्कोले, सूर्यवंशी, गोरे, वाटेकर व वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय पर्यटन मार्गदर्शक, जीप्सी चालक, होमस्टे व रिसॉर्ट मालक संजय ढिमोले, बंडू वेखंडे, दीपक ढिमोले, शुभम ढिमोले, तसेच स्थानिक ग्रामस्थ गजानन बापट, माजी सरपंच विलास शेंडे, पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर आणि मोहर्ली ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनीता कातकर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पूजन व ध्वजारोहण सोहळा

मोहर्ली प्रवेशद्वारावर सरपंच सौ. सुनीता कातकर, पर्यटक मार्गदर्शक शहनाज बेग, काजल निकोडे, संजय मानकर, अनिल तिवाडे व रिसॉर्ट मालक संजय ढिमोले यांच्या हस्ते पर्यटन गेटची पूजा करून, पर्यटकांच्या जीप्सींचे पूजन व हिरवी झेंडी दाखवून पर्यटन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्याच सफारीत वाघ व वन्यजीवांचे दर्शन

आज हंगामातील पहिल्या सफारीत पर्यटकांना रोमांचक वन्यजीव दर्शनाचा आनंद मिळाला.
पर्यटकांना ताडोबातील लोकप्रिय वाघ युवराज (T-164), दडियल (T-85) तसेच छोटी तारा (T-7) यांचे दर्शन झाले. याचबरोबर एक बिबट पर्यटकांच्या  नजरेस पडला.

सफारी दरम्यान पर्यटकांना सांबर, चितळ, गवा (गौर) यांसारखे अनेक वन्यजीव देखील पाहायला मिळाले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here