चंद्रपूरच्या स्थानिकांसाठी ताडोबा सफारीत सूट द्या, अन्यथा मोठे आंदोलन – धानोरकरांचा इशारा

0
274

मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग) :
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोअर क्षेत्र) आज दि.1 ऑक्टोबर 2025 पासून पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले. मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा जंगल सफारीसाठी दरवाजे पर्यटकांसाठी उघडले गेले असून देश-विदेशातून आलेल्या निसर्गप्रेमींनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, खासदार प्रतिभा ताई धानोरकर आपल्या कार्यकर्त्यांसह मोहर्ली गेटवर दाखल झाल्या. त्यांनी ताडोबा व्यवस्थापनाकडे स्थानिकांना जंगल सफारीसाठी सवलतीची मागणी केली.
त्यांच्या मते –
चंद्रपूर जिल्ह्याच्या स्थानिकांना सफारी मध्ये 30% सूट मिळावी.
क्रूझर वाहनाचे शुल्क सध्याच्या ₹720 ऐवजी ₹500 करण्यात यावे.
शनिवार-रविवारी च्या दिवशीचे जीप्सीचे दर कमी करण्यात यावेत.
तसेच आठवड्यातील एक दिवस चंद्रपूरच्या स्थानिकांसाठी कोअर सफारी मोफत ₹5000 मध्ये उपलब्ध करून द्यावी.
खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक सतत मानव-वन्यजीव संघर्षाचे बळी ठरत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिकांना सफारीमध्ये सूट देणे ही न्याय्य मागणी आहे.

या मागणीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी येल्लू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“एका आठवड्यात हा अहवाल आमच्या समितीसमोर ठेवला जाईल व त्यावर निर्णय घेतला जाईल.”
यावर समाधान न मिळाल्यास, मोठ्या आंदोलनाचा इशारा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here