
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील भामडेळी – सितारामपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचे वारंवार दर्शन होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच भामडेळी गावात वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ही भीती अधिक वाढली आहे.
येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीत रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक कामगार अद्यापही पायी या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे रिसॉर्ट व्यवस्थापनाने आपल्या वर्करांसाठी पिकअप-ड्रॉपची सोय करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तसेच, काही ठिकाणी रिसॉर्टच्या कँपसच्या बाहेर कचरा वाढलेला व काही ठिकाणी खाद्य अवशेष टाकल्याने वन्यप्राणी (वाइल्ड बोर व चितळ) त्या भागाकडे आकर्षित होत आहेत आणि त्या मागे वाघ देखील येत आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. या भागातून पायी किंवा दुचाकीने जाणाऱ्यांना धोका संभवतो.
वनविभागानेही या परिसरात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांची कापणी सुरू आहे.
गावकऱ्यांचे मत आहे की, “स्वच्छता मोहिमेत वारंवार गावकरी, गाईड आणि जिप्सी चालक सहभागी होतात; मग रिसॉर्ट धारकांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी.” वनविभागाकडूनही या परिसरातील रिसॉर्ट धारकांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात एक पाहणी करण्यास कमिटी नेमलेली असली तरी तिचे कामकाज प्रभावी पणे होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच, “जर आणखी एखादी अनिश्चित घटना घडली तर जबाबदार कोण ठरणार?” असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, आसपासच्या गावांमधून रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीही पिकअप-ड्रॉप सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक संस्थांकडून पुढे आली आहे.
