

मोहम्मद सुलेमान बेग (चंद्रपूर) :
दिनांक 12 मे 2025 रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर क्षेत्रातील उमरीखोरा परिसरात छोटा मटका (T-126) व T-158 या दोन नर वाघांमध्ये तीव्र संघर्ष झाला. या झुंजीत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता. वन विभागाने तात्काळ कारवाई करत प्रशिक्षित रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) मार्फत उपचार करून वाघाला परत जंगलात सोडले.
दिनांक 13 जूनपासून छोटा मटका (T-126) वाघाची प्रकृती सुधारत असल्याचे दिसले. मात्र, 14 जुलै रोजी त्याने एका दिवशी चार गायींवर हल्ला केला. या संघर्षामुळे त्याच्या उजव्या पायाला पुन्हा सूज आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आले. त्यानंतरही 15 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान त्याने गायी व गोऱ्यांवर हल्ले करून पशुहानी केली.
वनविभागाच्या उपाययोजना
वाघ लवकर सुदृढ व्हावा तसेच मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने पुढील विशेष पावले उचलली आहेत –
स्वतंत्र गस्त पथक (STPF, RRT, PRT व प्रादेशिक मनुष्यबळासह) तयार.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित आरोग्य तपासणी व अहवाल.
वाघ वावरणाऱ्या परिसरात विजेच्या धोक्याविरुद्ध खबरदारी.
GIS नकाशे तयार करून हालचालींचे सतत सनियंत्रण.
पशुहानी प्रकरणांचा तात्काळ निपटारा व नुकसानभरपाई.
गावकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींशी सतत संवाद.
मानद वन्यजीव रक्षक व NGO यांना माहितीचा पुरवठा.
दररोज निरीक्षण व साप्ताहिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.
सहाय्यक वनसंरक्षक (कोलारा) यांना नोडल अधिकारी नेमणे.
NTCA च्या मार्गदर्शक सूचनांनुसार समिती गठीत करून पुढील उपाययोजना.
वनविभागाचे आवाहन
सोशल मिडियावर छोटा मटका (T-126) संदर्भात काही अप्रमाणित अफवा पसरत आहेत. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
ही कार्यपद्धती छोटा मटका (T-126) वाघाच्या आरोग्य सुधारासाठी व मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


