
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रात विविध जनजागृती व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात मोहर्ली कोअर क्षेत्रातील मोहर्ली गेट येथे वृक्षारोपणाने करण्यात आली. यानंतर दिल्ली येथे या उपक्रमाचा व्यापक प्रसार करण्यात आला.
स्वच्छता आणि जनजागृतीचे उपक्रम:
भामडेली आणि मोहर्ली वनकर्मचारी वसाहत परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ताडोबा सभागृहात सर्प विषयी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये सर्पमित्र, मार्गदर्शक, वाहनचालक, पीआरटी सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्प विष, त्याचा परिणाम व आपत्कालीन उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले.

बाईक रॅलीद्वारे जनजागृती:
मोहर्ली पर्यटन गेट (कोअर) येथून मोहर्ली गावापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, मार्गदर्शक, पीआरटी सदस्य आणि वाहनचालक सहभागी झाले. या रॅलीतून व्याघ्र संरक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या प्रसंगी काही वाहनांचे वाटपही करण्यात आले.

स्वच्छ ग्राम मोहिम व वृक्षारोपण:
मोहर्ली वनपरिक्षेत्र, वनवसाहत आणि मोहर्ली गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवले गेले. “एक झाड मॉ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणातही प्रतिष्ठित नागरिक, वनअधिकारी, कर्मचारी, मार्गदर्शक, पीआरटी व वाहनचालक सहभागी झाले.

देवाडा गावात घनकचरा वाहन वाटप:
व्याघ्र दिनानिमित्त देवाडा गावात घनकचरा संकलन करणाऱ्या वाहनाचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांनी व्याघ्र संवर्धन, पर्यावरण शुद्धता आणि जैवविविधतेचे महत्त्व स्थानिक जनतेच्या मनामध्ये अधोरेखित केले.




