मोह’माया

0
175

काही वृक्ष मला कायम आजोबा वृक्ष आणि एकमेकांचे भाऊबंद वाटत आले आहेत. यात वड, पिंपळ, औदुंबर, मोह यांचा समावेश होतो. वड म्हणजे सगळ्यात मोठा. जीवनाचा दीर्घ प्रवास करून तृप्त मनाने आपली पारंब्याची दाढी कुरवाळत शांत बसलेला. नाही म्हणायला सुवासिनींना वटपौर्णिमेला भरभरून आशीर्वाद देणारा. पूर्वी बच्चेकंपनी याच्या पारंब्यावर झोके घेत अंगाखांद्यावर हुंदडायची. पण बदलत्या युगात विशेषतः टीव्ही, मोबाईल आल्यानंतर त्याचं हे बेबी सिटिंगचं काम सुटलं ते कायमचं. दुसरा पिंपळ म्हणजे डोईवर चांदी उगवत असली तरी “अजून खमक्या आहे बरं मी. म्हातारा बितारा झालेलो नाही”, असं टेचात सांगणारा. तसाही तो अश्वत्थ म्हणजे चिरंजीवीच. एकीकडे स्थितप्रज्ञतेचे, ज्ञानाचे धडे देणारा तर दुसरीकडे चैत्राच्या नाजूक पालवीत आपलं कोवळं हिरवंपण जपणारा. यांच्यातला औदुंबर म्हणजे या परिवारातील लाडावलेलं शेंडेफळ. कुठेतरी ओढ्याकाठी, मंदिरामागे, एखाद्या बागेच्या छुप्या कोपऱ्यात लपून मजा बघणारा. मला इतरत्र कुठे दिसणाऱ्या औदुंबरापेक्षा बालकवींच्या कवितेतला ऐलतटावर, पैलतटावर हिरवाई लेवून बेटाबेटातून वाहणाऱ्या निळ्या सावळ्या झऱ्याच्या जंगलात गोड काळिमा पसरलेल्या डोहाच्या जळात पाय टाकून बसलेला औदुंबर जास्त आवडतो. एरवी मंदिराच्या परिसरात दिसणारा औदुंबर मारूनमुटकुन बसवलेला वाटतो. त्याच्या पाया पडायला येणाऱ्या लोकांना म्हणतो कसा, ” या रे बाबा.. आलाच आहात तर घ्या आशीर्वाद” . असा विरक्त होऊन बसला तरी त्याची फळं लाल, गुलाबी होऊन पिकली की कसा रसरशीत दिसतो, अगदीच गुलछबू तरुणासारखा. यांच्याच मध्ये कुठेतरी मोह असावा. पण त्याच्या नशिबी शहरी झगमगाट, लोकवस्ती फारशी नाही. शेतशिवारात किंवा रानात त्याला स्थान. कधी वाटतं यांच्याच भावकीत असूनही परका झालेला किंवा केलेला. कुंतीने जलप्रवाहात सोडलेल्या आणि दूर दुसरीकडे वाढलेल्या कर्णासारखा. आजन्म अन्याय भोगणारा पण सततच्या अन्यायामुळे जी एक कटुता स्वभावतःच येते ती मोहात अजिबात नाही. चार-पाच बुजुर्ग आजोबांमध्ये एखादे आजोबा असतात न जे आपला पोक्तपणा कधीच मिरवत नाहीत. सगळ्या जगाचा अनुभव असतानाही लहानपण घेऊन राहतात. मोह अगदी त्यातलाच. पान, फुल, फळ, साल, मूळ अशा पंचांगाने उपयुक्त असूनही त्याच्या फुलांची दारू तयार होते म्हणून बदनाम झालेला. तरीही दानशूर कर्णासारखाच सारं सारं देत राहणारा, स्वतःला लुटवत राहणारा.. घेणारे लाख कृतघ्न असोत पण हा कायम स्नेहार्द नजरेनं बघणारा. खरतर मोह आणि दारू हे समीकरण अनेकांच्या डोक्यात इतकं घट्ट आणि फिट्ट बसलय की अशा महाभागांना मोहाचं नाव ऐकलं तरी नशा येते की काय, अशी भीती वाटते. त्यांना एवढही कळत नाही की असं शक्य असतं तर सगळे तळीराम मोहाच्या झाडाखालीच मुक्कामी राहिले असते. कुठलाही पदार्थ सडवला की त्यात फर्मन्टेशनची प्रक्रिया होते. मग त्यात अल्कोहोल निर्माण होते. आयुर्वेदात याच प्रक्रियेला संधान क्रिया म्हणतात. बाजरी, तांदूळ, द्राक्ष, ऊस, काजूगर अशा अनेक गोष्टींपासून दारू तयार होते. त्यासाठी जी प्रक्रिया वापरतात तिच मोहासाठी वापरतात. पण तांदळाचा भात, द्राक्ष, ज्वारी, बाजरी सारखी कडधान्ये खाताना कुणी विचारत नाही, नशा येईल का म्हणून. मात्र त्यांना मोह खायला द्या. लगेच विचारतील, ” काय हो… चढणार तर नाही ना ? ” अशांच्या या अगाध अज्ञानाचा राग करायचा की कीव करायची, हेच कळत नाही. मोह एरवी रानगर्दीत हरवलेलाच. जेव्हा फाल्गुन भरात असताना त्याच्या कुंच्यातून ती पिवळसर, मोतीया रंगाची फुलं डोकावू लागतात आणि त्यांच्या मादक घमघमाटाने सारं रान ‘मोयान मोयान’ होतं तेव्हा कुठं याच्या असण्याची वर्दी मिळते. मोह असा सर्वांगाने फुलू लागला की अवघी सृष्टी त्याच्या ‘मोहा’त पडते. त्याच्या फांदी, फांदीवर पाखरांची किलबिल काय, पायाशी माणसांची लगबग काय… सारच विलक्षण…! त्याहून विलक्षण त्याची फुलं. देवांचे वैद्य धन्वंतरीच्या हातात समुद्र मंथनातून प्राप्त अमृतकलश असतो न अगदी तशीच दिसतात याची फुलं. इतर फुलं कशी पाकळी पाकळीने उमलतात. पण ही मात्र सोनेरी कुपी असल्यागत लगडून असतात मोहाला. मोहक, मादक अत्तराच्या या कुप्या आपल्यात मधुरसाचा केवढा मोठा साठा दडवून असतात. इतर कुठलीही फुलं असोत मध देण्यात जरा कंजूषच.. म्हणजे अडुळसा घ्या, पळस घ्या शिंजिरासारखी बाकदार चोच हवीच मध प्यायला. नाही म्हणायला सावर वगैरे मनसोक्त मध पाजते. पण मोह म्हणजे जणू मधुशाळा उघडून बसलेला साकी.. “प्या लेको हवं तेवढं मध प्या” म्हणणारा. मोहफुलातील मध इतका तुडुंब भरलेला असतो की त्याला तोड नाही. कुणीतरी साखरेचा पाक यात ओतलाय असच वाटतं. म्हणून संस्कृत भाषेत याला मधुपुष्प किंवा मधुक पुष्प असं सार्थ नाव आहे. इंग्रजांनी याला इंडियन बटर ट्री असं नाव दिलं. याच्या टोरी म्हणजे बियांच्या तेलापासून लोणी करतात म्हणून त्यांनी हे नाव दिलं, असं वाचलय कुठेतरी. कदाचित हा लोकांच्या ब्रेड अँड बटर म्हणजे रोजीरोटीची सोय करतो म्हणूनही हे नाव दिलं असावं. पण लॅटिन भाषेत याचं शास्त्रीय नाव मधुका लॉंगीफोलिया आहे. म्हणजे पुन्हा मधाचा उल्लेख आलाच. ही फुलं वेचताना हात मधुरसाने माखून जातात. ही नाजूक फुलं वेचण्यात एक अनोखा आनंद असतो. मोहाच्या फुलांना फुलण्यापेक्षा गळण्याची घाई जास्त. मोह गळू लागला की तो नजारा पाहण्यासारखा असतो. मोत्यासारखी टपोर आणि तशीच मोतीया रंगाची ही फुलं अलवार टपटपू लागतात. त्यांना हातात घेऊन नुसतच निरखत राहावं वाटतं. खूप खूप सुंदर असतात ही फुलं. आणि नाजूक तर इतकी की त्याची तुलना फक्त पारिजाताशीच व्हावी.मला रात्री फुललेला पारिजात बघत त्याचा सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतो. पण सकाळी केशरी दांडी वर करून जमिनीवर निस्तब्ध पहुडलेली पारिजाताची अश्राप फुलं बघितली की मन गहिवरतं. गळलेल्या त्या फुलांवर अगदी जमिनीवरच्या धुलिकणाचेही घाव झालेले दिसतात. अगदीच जीवघेणी नाजूकता असते ही. मोहाची फुलही अशीच मातीत जखमी होणारी, वेचताना जणू बोटांनाच मखमली मिठी मारताहेत असं वाटणारी, आपल्या मधुरसाचे आठव ओघळ हातांना लगडून ठेवणारी. रात्री रानात गळणारा मोह बघणं हा एक उत्सव असतो. चंद्राच्या झिरमिर प्रकाशात त्या फुलांचं निरंतर गळणं.. त्याला एक नाद असतो. एखाद्या अभिसारीकेनं आपल्या परडीतील मोत्यांचे सर तोडत सारे मोती सांडत आकाशात मार्गे जात राहावं, असच काही. सकाळी मोहफुल वेचू जावेत तर आपण खाली बसून वेचताना सारखी डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर पडत राहतात. वाटतं मोह टपली मारत विचारतोय, “काय रे..किती हळू वेचतोस. हे अजून वेचायचे आहेत तुला.” पण कधी वाटतं मोह गळतोय, झरतोय की रडतोय ? ही मोहफुल म्हणजे त्याची आसवं तर नाहीत ? अश्रूच असतील ही फुलं. मग ही अश्रूंसारखी खारट का नाहीत ? पण मोह मुळातच इतका गोड की त्याची आसवं खारट कशी असतील ? वाटतं सततचे दुर्लक्ष, अवहेलना, दुःख, वेदनेनं त्याला भडभडून येत असावं. मग बसतो सारखा रडत, अश्रूफुलं ढाळत. तीसुद्धा पशू, पक्षी, मानव सर्वांना उपयोगी पडतात म्हणून या रडण्यातही एक समाधान मिळत असेल त्याला. ग्रीक पुराणकथांमधला राखेतून जन्मणारा फिनिक्स पक्षी माहिती आहे न ? त्याचे अश्रू जखमेवर पडले की जखम लगेच बरी होते म्हणे. मोहाचे अश्रू केवळ जखम बरी करणारे नाहीत तर शरीर सुपोषित करून जीव जगवणारी आहेत. लहानपणी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून कथा ऐकायला लागलो की ती भूतकाळात हरवायची आणि सांगायची, ” बाबा रे पूर्वी पावसाच्या झडी असायच्या. पंधरा, पंधरा दिवस सूर्य दिसायचा नाही. सारखा पाऊस. घराबाहेर निघणं अशक्य व्हायचं. मग हाताला काम नाही, पोटाला चारा नाही. फाके पडायचे. उपासमार व्हायची. माणसं बारिक, बारीक व्हायची. हाडं दिसू लागायची. म्हणून या काळाला ‘हाडोक’ म्हणायचे. तेव्हा घरात असलेलं थोडं ज्वारीचं पीठ, त्यात मोहफुल मिसळून भाकरी करायचे. ही भाकरी माणसं जगवायची. काळ निभून जायचा”. आजीच्या या आठवणीत मोहाबद्दलची कृतज्ञता असायची. मोहाची ही फुलं फुलतात तेव्हा त्यांच्यावर सर्वाधिक आसक्त असतात ते भुंगे. हे प्रेमवेडे भ्रमर फुलांभोवती सारखे रुंजी घालत राहतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भुंग्याच्या याच फुलांभोवती पिंगा घालण्याच्या दृश्यातून मानवाला नृत्यकलेचा शोध लागला आहे. आदिवासी संस्कृतीचे गाढे अभ्यासक दिवंगत आचार्य मोतीरावण कंगाली यांच्या ‘ गोंडी नृत्याचा पूर्वेतिहास’ या पुस्तकात नृत्याच्या उत्पत्तीची एक अतिशय अदभूत कथा आहे. झालं काय की, आदिवासी समाजाचे गुरू पहांदी पारी कुपार लिंगो यांचे शिष्य पेनगंगा ( सल्ला, गांगरा या ऋण व धन शक्ती एकत्र येतात तेव्हा पेन म्हणजे ऊर्जा किंवा देवतांची निर्मिती होते, अशी आदिवासी समाजात संकल्पना आहे म्हणून ही पेनगंगाच आहे. पुढे तिचा अपभ्रंश पैनगंगा असा झाला असावा. जसा वेनगंगा नदीचा वैनगंगा असा झाला.) नदीवर अंघोळीसाठी निघाले होते. त्यांना वाटेत एक असंख्य फुलांनी बहरलेला वृक्ष दिसला. त्या फुलांवर अनेक भुंगे गुंजारव करत फिरत होते. त्यांच्या त्या गुंजनात एक विशिष्ट नाद होता, ताल होता आणि खास लय होती. हे सगळे शिष्य भुंग्याचा तो नृत्यगान आणि मधुरसपानाचा अदभूतरम्य सोहळा अनिमिष नेत्रांनी बघू लागले. गुंजारवाची ती लय त्यांच्यात हळू हळू भिनू लागली. भान हरपून त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले. भुंगे जसे फुलांभोवती गोल, गोल फिरत “रूं ss रूं ss रूं ss” आवाज करत फिरायचे अगदी तसाच आवाज काढत हे सारे शिष्य त्या वृक्षाभोवती फिरू लागले. हात हातात अलवार विसावू लागले, लयबद्ध पदन्यास होऊ लागले, कधी एकत्र तर कधी लय्या लय्योरी जोड्या करत सारेच मग्न झाले. निसर्गाने जणू त्यांना नृत्याची दीक्षा दिली होती. असं भान हरपून नाचताना सकाळची दुपार झाली. सूर्य जरा प्रखर होताच नृत्यगायनात बेहोष सगळे भानावर आले. सगळ्यांना एकदम गुरू कुपार लिंगोची आठवण झाली. अरे आपण सकाळी निघालो पण अजून नदीकडे गेलोच नाही. गुरू वाट बघत असतील, रागावले असतील या विचाराने त्यांची घाबरगुंडीच उडाली. सगळे नदीकडे पळाले. पटापट अंघोळी आटोपून आश्रमात परत आले. इकडे पहांदी पारी कुपार लिंगो अद्याप शिष्य आले नाहीत म्हणून चिंतित होते. सगळे गोटूलमध्ये पोहोचताच त्यांनी इतका उशीर का झाला, याचं कारण विचारलं. शिष्यांनी त्यांना तो फुलांनी बहरलेला वृक्ष, भुंगे, गुंजन, नर्तन असा सगळा वृत्तांत सांगितला. केवळ सांगितलाच नाही तर आपले गुरू लिंगो यांच्या भोवती फेर धरून तसेच भुंग्यासारखं गुंजन करत नाचू लागले. गुरू लिंगो यांनाही हा प्रकार खूप आवडला. तेही शिष्यांसोबत नाचू लागले. पुढे त्यांनी ही नृत्यशैली अधिक विकसित आणि परिष्कृत केली. आजही आमचे आदिवासी बांधव हेच गायन, नर्तन करून निसर्गाशी आपली नाळ घट्ट करतात. यातील प्रारंभीच्या स्वरात थोडाफार फरक आहे. कोणत्याही पाट्याची म्हणजे आदिवासी गीताची सुरुवात रूं ss रूं ss रूं ss चे स्वर थोडे बदलून रेनं ss रेनं ss रेनं ss या स्वरांनी होते. मध्य प्रदेशात मंडला, बालाघाट, जबलपूर, सिवनी या भागात रेनंss रेनं ss रेनं ss असे सूर काढतात तर चंद्रपूर, गडचिरोली, आदीलाबाद, कांकेर, बस्तर या भागात रेलो ss रेलो ss रेलो ss रेलो ss असे सूर गीताच्या प्रारंभी असतात. दिवंगत आचार्य कंगाली यांनी या कथेत त्या वृक्षाचं नाव लिहिलेलं नाही. पण हा वृक्ष मोहाशिवाय इतर कुठलाही नसेल, असा माझा ठाम विश्वास आहे. स्वतःला विकसित, सुसंस्कृत वगैरे समजणाऱ्या इतर संस्कृतीनी सदैव उपेक्षित ठेवलेल्या मोहाला खऱ्या अर्थाने कुणी आपलसं केलं असेल तर या थोर आदिवासी संस्कृतीनं. फक्त आपलसं केलं नाही तर त्याला थेट देववृक्षाचा दर्जा दिला. आदिवासींचे देव या मोहावर असतात. पूजेच्या वेळेस ते या झाडावरून उतरवले जातात. आदिवासींच्या जीवनात या वृक्षाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. याची फुलं तर खूपच महत्त्वाची. एखादा आदिवासी गावात असो, शहरात असो की परदेशात असो.. त्याला मूठपुजा करायची असो की इतर कुठलीही पूजा.. मोहाची फुलं हवीतच. त्याशिवाय पूजा होऊच शकत नाही.म्हणून आदिवासी बांधव वर्षभर पुरतील एवढी फुलं साठवून ठेवतात. हा खऱ्या अर्थानं त्यांचा कल्पवृक्ष आहे. त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक. कदाचित तो पूर्वी इतरही संस्कृतीत पूज्य किंवा प्रिय असावा. पण पुढे तो अव्हेरला गेला. मग शेवटी रमला या आदिम संस्कृतीत. त्यांचा आणि फक्त त्यांचाच झाला. जसा कौंतेय असूनही कर्ण वाढला तो रथचालक अधिरथ आणि त्याची पत्नी राधाच्या मायेच्या सावलीत. त्यांनी त्याला इतकं प्रेम दिलं की आयुष्याच्या अखेरपर्यंत त्याने कौंतेय नाही तर राधेय म्हणवून घेणच पसंत केलं. म्हणून मला मोहाची आदिम संस्कृतीचा आदिम, आदीवृक्ष, देववृक्ष हिच ओळख मनापासून आवडते. हजारो वर्षे उपेक्षित राहिलेल्या आणि अजूनही उपेक्षितच असलेल्या आदिवासी संस्कृतीची आणि मोहाची नाळ याच उपेक्षेच्या आदिम दुःखाने जुळली आहे. म्हणून ते असे एकजीव झाले आहेत. मोहाच्या अश्रूरूपी फुलांची पूजा बांधणारी ही आदिम संस्कृती जगातील समस्त संस्कृतीहुन निराळी, अधिक विकसित, निसर्गस्नेही आणि संवेदनशील आहे. मोह असा रडू, गळू लागला की आपल्या पिकून पिवळ्या झालेल्या पानांचा अंगरखाही फेकून देतो. तसे मोह रात्री किंवा सकाळी गळतात. पण एखाद्या हट्टी मोहाला भरदुपारी गळायची हुक्की येते. त्याला मग ‘दुपाऱ्या मोह’ म्हणून चिडवतात. मला सारखं वाटतं मोहाचं हे गळणं खूप खूप वेदनादायी असावं. म्हणून त्याचं गळणं संपलं की निसर्ग त्याला लालचुटुक, राणी रंगाच्या पानोळ्यात लपेटून घेतो. जणू तो पुन्हा नव्यानं जन्मलाय. एखाद्या लालसर गोधडीत एखादं लालस नवजात बाळ लपेटून ठेवावं तसा मोह त्या नवेल्या पालवीत दिसतो.पण त्याचं हे बालपण फार दिवसांचं नसतं. लवकरच ही पान लालसर रंग सोडून जरा कत्थई लाल होत पोपटी, हिरवा रंग धारण करतात. मोठी झाली तरी ही पानं कधीच रखरखीत, जरठ होत नाहीत. कायम आपली कोवळीक जपून ठेवतात. म्हणून मोहाच्या पानांची पत्रावळ कशी मऊ मखमली असते. पळसाला अशी कोवळीक नाही जपता येत. तो विरागी होऊन भगवी फुलं फुलवत असला तरी वाटतो जरा तापटच. दुर्वास किंवा विश्वामित्र ऋषीसारखा त्याच्याही संन्यस्त वृत्तीत एक तापटपणा असावा. म्हणून तो त्याच्या पानात उतरलाय. मोहाला मात्र ठरवूनही कठोर होता येत नाही. नवी पालवी हिरवी होत असताना आता त्याला हिरवी फळं धरू लागतात. पावसाळ्याकडे ही फळं पिकली की गळू लागतात. या फळात आंब्यासारखा गोडुस गर असतो. त्यातून निघणारी बी म्हणजे टोळम्बी किंवा आमच्या भागात टोर अथवा टोरी म्हणतात. यापासून निघणारं तेल आमचे आदिवासी खाण्यापासून केसांना, अंगावर जखम, फोड असेल, कृमिकीटक चावले असतील तर त्यावर लावण्यापर्यंत सगळ्याच कामांसाठी वापरतात. कधी कधी घरात फिरणारी पाल अचानक सू करते. तिचं हे मूत्र अंगावर पडलं की तिथं बारीक फोड येतात. मोहाची बी सहाणेवर उगाळून तिथे लावलं तर पटकन आराम मिळतो. तसही मोहाचं तेल त्वचाविकारावर जादूसारखं काम करतं. माझ्या आज्जीनं जपून ठेवलेल्या टोरी अजूनही एका छोट्या काळ्या डब्यात आहेत. या तेलात आणखी एक गुणधर्म असतो. ते तुपासारखं घट्ट होतं. तुम्ही बाटलीत भरलेलं मोहतेल पाहिलं तर ते मोहाचं तेल आहे की तूप आहे, हे ओळखूच शकणार नाही.गंमत म्हणजे मोहतेल हा शब्द झाडीबोलीत मध किंवा मधाच्या पोळ्यासाठी वापरला जातो. मला वाटतं मोह आणि मधाचं जुनं नातं असावं. अनेक आयुर्वेदिक ग्रंथात मोहाचे उपयोग सांगितले आहेत. महर्षी वाग्भटांच्या अष्टांगहृदयम ग्रंथात याचे महत्वपूर्ण योग दिले आहेत. पूर्वी मोह बऱ्यापैकी मानवी भावविश्व व्यापून असावा, त्याला खूप आदरही असावा. म्हणूनच नृपती हाल सातवाहन यांच्या प्राकृत भाषेतील गाथा सप्तशती ग्रंथात मोहावर काही अप्रतिम गाथा आहेत. या ग्रंथाचा कवी, गीतकार राजा बढे यांनी शेफालिका या नावाने केलेला पद्यानुवाद अतिशय वाचनीय आहे. यातील एक गाथा देण्याचा मोह आवरत नाही. आता ही १०३ क्रमांकाची गाथा बघा.

I l बहु-पुप्फ-भरोणामिअ भूमी-गअ-साह सुणसु विणत्तिम l
गोला-तड-विअड-कुडडग-महुअ सणिअं गलिज्जासु l l १०३ l lहे प्राकृत भाषेत आहे.
आता हिच गाथा संस्कृत भाषेत बघा
I i बहुपुष्पभरावनानिमित्त भूमीगतशाख शृणू विज्ञप्तिम ।
गोदातटविकटनिकुंजमधूक शनैर्गलिष्यसि l l १०३ ll
आता कविवर्य राजा बढे यांनी या गाथेचा केलेला सुंदर पद्यानुवाद बघा.

गोदातटी गर्द राइ मोहगंध वनवासी ।
रे मधूक, पुष्पभरे भूमीवर झुकलासी।
वेचाया वेळ हवा, भेटाया याच स्थली।
रे हळूहळू ढाळी सख्या सुमने ती तरुखाली ।
वाट बघत वेचिन मी, भेटाया धुंदीत मी।
करि सहाय्य मज मधुका तुजलागी वंदित मी ।।१०३।।

‌आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. मोह वेचायला जाते असं सांगून एक युवती प्रियकराला भेटायला गोदावरी नदीच्या काठी आली आहे. तिचा प्रियकर अजूनही आला नाही आणि मोह झर झर गळतोय. तो असाच गळत राहिला तर तिची परडी लवकर भरेल आणि तिला घरी जावं लागेल. मग ‘ती’ बिचारी ‘त्याला’ भेटणार कशी ? म्हणून ती मोहालाच विनवणी करते की, “मोहा जरा हळू ढाळ तुझी फुलं.” मोह नक्कीच हळूहळू गळला असेल. खूपच समंजस आहे तो. एखाद्या व्यक्तीला नाही का अगदीच कमी वयात प्रौढत्व येतं तसच मोहाच्या बाबतीत घडत असावं. तुम्हाला मोह कायम मोठा, डेरेदार, पूर्ण विकसित दिसेल. त्याचं बालरूप क्वचितच दिसतं. एरवी महावृक्ष म्हणवणारे वड, पिंपळ एखाद्या पडक्या वाड्याच्या भिंतीच्या फटीतून, कुठे नदी, नाल्याकाठी आपलं बालरूप घेऊन मस्त बालपण जगून घेतात. एखाद्या झाडावर उगवून आले तर त्याच्या अंगाखांद्यावर खेळता खेळता त्यालाच एक दिवस आपल्यात सामावून घेतात. एकूण काय तर कुठल्याही वृक्षांचे बालपण ते प्रौढत्व आपण बघू शकतो. पण मोहाचं बालतरु रूप सहसा दिसत नाही. दिसलं तरी कुणी बघत नाही. वाटतं हा जन्मतः मोठा होऊन जन्मतो की काय. बरं याला आजूबाजूच्या वृक्षावर कुरघोडीसुद्धा करता येत नाही. परवा रस्त्याने फिरताना दूर शेतात चिंचेच्या झाडाच्या बाजूला एक मोहवृक्ष पाहिला. एरवी चहुबाजूंनी घेरेदार होत वाढणाऱ्या मोहाने चिंचेच्या बाजूच्या आपल्या फांद्यांची वाढ चक्क आवरती घेतली होती चिंचेला त्रास होऊ नये म्हणून. त्याला ओरडून सांगावसं वाटलं, ” अरे मोहा, या निष्ठुर जगात इतका सालसपणा, चांगुलपणा बरा नव्हे रे”. पण तो तसाच आहे. साधा, सालस, असामान्य असूनही सामन्यच राहणारा. वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ मधल्या कचासारखा. प्रत्यक्ष देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र आणि असामान्य बुद्धिमत्तेचा स्वामी असूनही एक जांभूळ तोंडात टाकून आपली जांभळी झालेली जिभ दाखवत एका छोट्याशा बालिकेला खळखळून हसवणारा. सौंदर्याला अकाल मृत्यूचा शाप असतो, असं म्हणतात. सज्जनता, सहनशीलता, सालसता, साधेपणा याला कदाचित उपेक्षा, वंचिततेचा शाप असावा. तसा तो मोहालाही आहे. असे सगळे विचित्र विचार करत रानात भटकंती करताना थकलो की एखाद्या मोहाच्या सावलीत शांत बसतो तेव्हा तो म्हणतो कसा, ” बाबा रे हे असच जगायचं असतं… साधेपणाने, आनंदाने, सगळं देत, स्वतःला लुटवत.. त्यातच खरा अर्थ आहे. बाकी सगळी मोहमाया.” मग मीही म्हणतो, ” मोहा खरच धन्य आहे तुझी ‘मोह’ माया !”

मिलिंद मधुकरराव उमरे

मानद वन्यजीव रक्षक, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here