
वन विभागाच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक
चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका कॉलरवाला वाघाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः भामडेली ते कोंडेगाव मार्गावर या वाघाचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
24 सप्टेंबर 2025 रोजी भामडेली येथील रहिवासी श्री. अमोल बाबन नन्नावरे (वय 37) हे आपल्या शेतात जात असताना या वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती.त्या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी वाघाला पकडण्याची मागणी केली होती.
वन विभागाने तात्काळ उपाययोजना करत तज्ञ पथकाच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली. अखेर सततच्या आणि नियोजनबद्ध प्रयत्नांनंतर दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5.00 वाजता वाघाला यशस्वीपणे बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. पकडलेल्या या उपप्रौढ नर वाघाची ओळख T-91 SAM-1 अशी झाली आहे.
वाघाला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या पकडण्यात आले असून, त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले आहे.
या कारवाईनंतर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील दहा गावांतील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला असून, वन विभागाच्या तत्पर प्रतिसादाचे आणि दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार स्थापन करण्यात आलेल्या तांत्रिक समितीच्या शिफारशींवर आधारित निर्णयानुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) यांनी या कारवाईस मान्यता दिली आहे.
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि वन्यजीव संरक्षणासाठी प्रशासनास सहकार्य करावे.


