जंगलात पळस फुले मोहक वाटतात

0
316

राजेश महाजन
गडचिरोली

आमच्या गडचिरोलीच्या बसस्थानकाच्या अवती भवती पळस असे फुलारून आलेत. आपल्या डोक्यावर असा लाल भडक फुलांचा संभार घेऊन मिरवत असलेला पळस कुणाचंही मन आकर्षूण घेतो. रस्त्याच्या कडेला, जंगलात, माळरानावर कुठेही असा फुललेला पळस पाहिला की मन क्षणभर थबकते व त्या पळस फुलांकडे पहात रहावंसं वाटते. कारने किंवा बसने जातांना रस्त्याच्या दुतर्फा फुललेले पळस फारच मोहक वाटतात. जंगलात दुरवर पसरलेली भडक फुले पाहून वाटते जणू जंगलाला आग लागून आगीच्या ज्वाळा उफाळून वर येत आहेत.
फूललेला पळस पाहिला की आता फाल्गून आला, वसंताची चाहूल लागली, वसंतोत्सव सुरू झाला याची नांदी घेवून येतो. आता रंगोत्सव येणार याचाही आनंद होतो. कारण याच महिन्यात होळी – धुलिवंदनचा आवडीचा सण येतो. धुलिवंदन किंवा रंगपंचमी व पळसफुले यांची सांगड मला माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात.
बालपणी आम्ही विकतचे रंग घेऊन खेळण्या ऐवजी पळसाच्या फुलांपासून रंग तयार करून रंगपंचमी खेळायचो. त्यासाठी दोन दिवस आधी गावाशेजारच्या जंगलात जाऊन फुलांसकट पळसाच्या फांदया तोडून आणायचे. मित्रांसोबत गेल्यामुळे फुलांची वाटणी करताना कधी भांडणंही व्हायची पण लगेच मिटायची. ही फुले मग बादल्यात पाणी भरून त्यात बुडवून ठेवायची. नंतर रंगपंचमीच्या दिवशी या रंगीत पळस पाण्याने रंग खेळण्याचा आनंद घ्यायचो.
त्या काळात आम्हाला माहितही नव्हते की आम्ही पर्यावरण पुरक नैसर्गिक रंग वापरुन होळी खेळायचो ही पुसटशी कल्पनाही तेव्हा मनाला शिवून गेली नाही. या उलट आज निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी नैसर्गिक रंग व पर्यावरण पुरक होळी खेळण्याचा प्रचार व प्रसार करतात. जे आम्ही लहानपणी सहज करीत होतो.
त्या काळात आमच्या शेतावर दोन पळसाची झाडे होती. याचा मला फारच अभिमान होता. कारण आपल्या घरच्या शेतावरील पळसाची फुले आणून रंग तयार करण्यात वेगळाच आनंद होता. कधी कधी दोन,तीन किंवा पांच पैशाची फुले मित्रांना विकण्याची मज्जा काही औरच होती. घरच्या पळसाची फुले आणण्याचं एक कारण म्हणजे मित्रांसोबत कधी जंगलात गेलो तर बाबांच्या हातचा मार व आईच्या शिव्या खायला लागे त्यापासून बचाव होत होता.
या पळसाचे ऊपयोगही विविध आहेत. त्याच्या प्रत्येक अवयवांचा ऊपयोग होतो. पाने, फुले, शेंगा, बीया, झाडांची साल, त्याची मुळे या सर्वांचा ऊपयोग आयुर्वेदिक औषधी म्हणूनही करतात. पत्रावळ्या -द्रोण करण्यासाठी आम्ही पाने तोडून आणायचो. पाने तोडताना “पळसाला पाने तिनच ” ही म्हण खोटी ठरविण्या साठी पाच पाने असलेली डहाळी शोधायचो. सापडली की त्या म्हणीला अपवाद शोधल्याचा आनंद व्हायचा ! तांदळाची पापडं करण्यासाठी तर पळसाची पाने आईला आणून द्यावी लागत असे. रंग खेळताना हे पाणी पोटात गेलं तरी अपाय होत नव्हता. उलट या फुलांचं पाणी उन्हाळी लागली, उन्हाची झाव लागली की औषध म्हणून देतात. यासाठी आम्ही फुले वाळवून साठवून ठेवत होतो. या फुलांचा नैसर्गिक चहा म्हणून उपयोग करतात. या फुलांच्या रंगीत पाण्याला एक आगळा वेगळा सुगंध येतो, तो सुवास आठवताच नाकातील घ्राणेंद्रिये आजही ऊद्दिपीत होतात.
वाळलेल्या शेंगाच्या बीया जमा करून किलोच्या भावाने बाजारात विकत असू. विकत घेणारा बाजारात वजन काटा घेवून बसलेला असे व त्याच्या समोर पळस, करंज, मोहाच्या टोळ बीया, कडुनिंबाच्या निंबोळ्या, डिंक याचे ढीग असायचे. ह्या बीया विकत घेवून तो काय करीत असेल असा प्रश्न तेव्हा बालमनाला भेडसावत असे. पण या सर्वांची उत्तरं आमच्या आजोबा जवळ असायची.
अशा या बहूगुणी पळसाची महती काय वर्णावी. आयुर्वेदात याचे औषधी उपयोग सांगितले असतील. फूललेला पळस पाहिला की बालपणीच्या याच्याशी जुळलेल्या सगळ्या आठवणींना उजाळा येतो. आजहि पळस फुलांचं आकर्षण मनात ठासून भरलेलं आहे. पळस माझ्या मित्रासारखा मनात रुंजी घालतो व माझ्या ह्रदयात घर करून राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here